सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

सरसम ग्रामपंचायत निवडणूक 2015

                                          सरसम ग्रामपंचायत प्रतापराव देशमुख गटाकडे 11 पैकी 9 उमेदवारांचा बहुमताने विजय  
    नांदेड दि. 3 :- हिमायतनगर तालुक्यातील सरसम ग्रामपंचायत निवडणुकीत माजी बांधकाम, अर्थ समिती सभापती प्रतापराव देशमुख यांच्या ग्राम विकास पॅनलने 11 पैकी 9 जागा जिंकून स्पष्ट बहूमत प्राप्त केले आहे. मावळत्या सत्ताधारी ग्रामविकास लोकशाही आघाडी गटाला केवळ दोन जागेवर समाधान मानून पराभव स्विकारावा लागला आहे.

        सरसम ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायत कामकाजात भ्रष्टाचार वाढला होता. गावात अवैध दारु विक्री, नैसर्गिक आपत्ती मधील मदत निधीचा भ्रष्टाचार, पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा अशा अनेक मुलभूत समस्यांनी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. यात विद्यमान सरपंचांची पत्नी कमलबाई कोलमकर यांना देशमुख गटाचे संगिता मिराशे तर माजी सरपंच सुनील वानखेडे यांना अप्पाराव वानखेडे यांनी पराभूत केले आहे. 

            श्री. देशमुख म्हणाले की, गावातील विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे. सर्वांगीण विकासाची दृष्टी डोळ्यासमोर ठेवून नागरीकांच्या सुविधांवर भर दिला जाणार आहे. गावाला नवी दिशा देण्याचे काम केले जाईल. ग्रामपंचायत भ्रष्टाचार मुक्त, उत्तरदायी, पारदर्शक, स्मार्ट राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            विजयी उमेदवार सौ. संगिता अरविंद धोबे, विलास सुर्यवंशी, सौ. शशीकला मिलींद नगराळे, संगिता हरिचंद्र मिराशे, दत्ता अडबलवाड, सौ. सयाबाई सदाशीव कांबळे, अप्पाराव वानखेडे, सुभद्राबाई लक्ष्मण उट्टलवाड, गणेश जाधव यांची जल्लोषात मिरवणूक काढून मतदाराचे आभार मानले. 
                                                                               00000000  
दि. 3 नोव्हेंबर 2015   



शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

कापसाची आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी सुरु

कापसाची आधारभूत किंमत योजनेअंतर्गत
 धर्माबाद येथे खरेदी सुरु 
नांदेड, दि. 6 :- राज्‍य सहकारी कापूस उत्‍पादक पणन महासंघ किंमत आधारभूत योजनेअंतर्गत नांदेड जिल्‍ह्यात मे. एल. बी. कॉटन कं. जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी धर्माबाद या केंद्रावर शुक्रवार 6 नोव्हेंबर 2015 रोजी कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाच्‍यावतीने विभागीय व्‍यवस्‍थापक एस. जी. हनवते यांनी दिली आहे.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार महासंघ कापूस खरेदी करत असून कापसाचा चुकारा शेतकऱ्यांच्या नावाने आरटीजीएसद्वारे थेट बँकेत जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी कापूस विक्रीस आणतांना खरीप हंगाम 2015 मधील पेऱ्याची अद्ययावत नोंद असलेला सात-बाराचा उतारा, आयएफसी कोड असलेल्या बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची व आधार कार्डची छायांकित प्रत आणणे बंधनकारक आहे. कापसाला केंद्र शासनाने जाहीर केलेल्‍या निकषाअन्‍वये पुढे नमूद केल्‍याप्रमाणे दर देण्‍यात येईल. जात, तंतूची लांबी, तलमता यानुसार हमी दर पुढील प्रमाणे राहील.  
एलआरए 5166- तंतूची लांबी 26 ते 26.5 -तलमता 3.4 ते 4.9-हमी दर 3 हजार 900 रुपये. एच-4/एच-6- तंतूची लांबी 27.5 ते 28.5-तलमता 3.5 ते 4.7 -हमी दर 4 हजार रुपये. बन्‍नी /ब्रम्‍हा- तंतूची लांबी 29.5 ते 30.5-तलमता 3.5 ते 4.3 -हमी दर 4 हजार 100 रुपये. 

कापसाची खरेदी केंद्र शासनाने कापसाकरीता निर्गमित केलेल्‍या एफएक्‍यू नॉर्म्‍सच्‍या 24 ऑगस्‍ट 2015 रोजीच्‍या आदेशाप्रमाणे केली जात आहे. कापसाची आर्द्रता 12 टक्‍काच्‍या वर असल्‍यास असा कापूस स्विकारला जाणार नाही. कापूस विक्रीस आणतांना नैसर्गिक आर्द्रता 8 टक्‍के पेक्षा जास्‍त आढळल्‍यास व तलमता निर्धारीत नॉर्म्‍स प्रमाणे न आढळल्‍यास त्‍याकरीता केंद्र शासनाने निर्गमित केलेल्‍या आदेशाप्रमाणे किंमतीमध्‍ये कपात केली जाईल, असे महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी कापूस उत्‍पादक पणन महासंघाचे नांदेड विभागीय व्‍यवस्‍थापक यांनी कळविले आहे.                   0000000

श्रावण महिना...! गुरुवार 17 सप्टेंबर 2015