सोमवार, २५ जानेवारी, २०१६

येत्या 26 जानेवारीपासून सर्वच जिल्ह्यांतील तक्रारींचे निवारण

‘आपले सरकार’ वेब पोर्टलच्या माध्यमातून
राज्यातील प्रशासन ‘ऑनलाईन प्रजासत्ताक’!
मुंबई, दि. 25 : सर्वसामान्य नागरीकांच्या मंत्रालय स्तरावरील प्रशासकीय तक्रारींचे निवारण करण्यासाठी गेल्यावर्षी 26 जानेवारीला सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ या वेब पोर्टलच्या माध्यमातून यंदाच्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील सेवा उपलब्ध होणार आहेत. अवघ्या वर्षभरातच संपूर्ण राज्यासाठी सेवा प्रदान करणारे हे पोर्टल नागरीकांसाठी खऱ्या अर्थाने लोकाभिमुख प्रशासनाचे माध्यम ठरणार आहे.
या पोर्टलद्वारे गेल्या 15 ऑगस्टला सहा जिल्ह्यांसाठी तक्रार निवारण प्रणाली उपलब्ध करण्यात आली होती. त्यानंतर पाच महिन्यातच राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी ही सेवा उपलब्ध करून ऑनलाईन प्रशासनासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
नागरीकांना ऑनलाईन आणि सुलभतेने तक्रारी सादर करता याव्यात, यासाठी शासनातर्फे गेल्या प्रजासत्ताकदिनी आपले सरकार’ हे पोर्टल सुरू करण्यात आले. या पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील विविध प्रकारच्या प्रशासकीय सेवा आता उपलब्ध होतील. येत्या 26 जानेवारीला या महत्त्वपूर्ण टप्प्यास प्रारंभ होणार असून त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कामकाज पेपरलेस व डिजीटल होण्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जाणार आहे. यामुळे नागरीकांना संबंधित विभागाकडे तक्रारी करणे सुलभ होणार असून तक्रार दाखल करण्याविषयी माहिती, त्यावरील कार्यवाही, लागणारा कालावधी आदी माहितीही त्याला याच पोर्टलच्या माध्यमातून मिळणार आहे. या यंत्रणेत नागरीकांकडून दाखल झालेल्या तक्रारींच्या कार्यवाहीचा पाठपुरावा मुख्यमंत्री कार्यालय करणार आहे.
आपले सरकार हे वेबपोर्टल म्हणजे डिजीटल महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. राज्य शासनाने 2015 हे वर्ष डिजीटल वर्ष म्हणून साजरे केले आहे. डिजीटल महाराष्ट्र मोहिमेंतर्गत हा प्रयत्न सुरू झाला असून पारदर्शकता आणि गतिमानतेतून सुशासन देणे शक्य झाले. तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला घरपोच सेवा देण्याचा हा प्रयत्न आहे.
लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध विभागांच्या 252 सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 47 सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. 26 जानेवारीपासून 150 हून अधिक सेवा ऑनलाईन करण्यात येणार आहेत.
वेब पोर्टलवर तक्रार दाखल करताना जिल्हा, विषय, तक्रारीचे स्वरूप, संबंधित विभाग, प्रशासन प्रकार आदी माहिती दिल्यानंतर नागरीकांना तक्रारीसोबत कागदपत्रेही जोडता येतील. या प्रक्रियेसाठी तक्रारदाराचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक आवश्यक राहणार आहे. तक्रार दाखल करण्यासाठी वन टाइम पासवर्ड मिळेल. तसेच तक्रार नोंदविल्यानंतर मिळणाऱ्या टोकन आयडीचा वापर करून तक्रारींचा मागोवा घेता येणार आहे. पोर्टलवर तक्रार निवारण, सेवा हमी, माहितीचा अधिकार आणि सहयोग असे चार विभाग असून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, महापालिका अशा चार कार्यालयांशी संबंधित तक्रारी करता येऊ शकतील. या पोर्टलशी सर्व यंत्रणा जोडल्या असल्याने ही तक्रार संबंधित कार्यालयाबरोबरच वरिष्ठ स्तरावरील अधिकारी पाहू शकतील. तक्रारीबाबत झालेली कार्यवाही संबंधितांना 21 दिवसाच्या आत कळणार आहे.
सदर प्रणालीस नागरीकांचा तसेच प्रशासनाचा अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला असून पोर्टलच्या सुरवातीपासून 25 जानेवारी 2016 पर्यंत एकूण 23 हजार 838 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 81 टक्के तक्रारीचे निराकरण झाले आहे.
आपले सरकार या संकेतस्थळावर जाण्यासाठी www.aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाणे आवश्यक आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत हे वेबपोर्टल उपलब्ध आहे. या वेबपोर्टलमुळे माहितीचा कायदा ऑनलाईन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य झाले आहे. या कायद्याचा वापर करताना कोर्ट फी स्टॅम्प वापरावे लागत होते. आता आपल्या बँक अकाऊंटमधून आवश्यक असलेले शुल्क इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांचा वापर करून भरता येईल. तसेच ‘आपले सरकार’ हे मोबाईल अॅप्लिकेशन ॲन्ड्रॉईड आयफोन आणि विन्डोजवरून डाऊनलोड करता येणार आहे.
राज्यातील जनतेचा थेट वरिष्ठांपर्यंत संपर्क साधणारी ही ऑनलाइन व्यवस्था आहे. मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून दुहेरी संवादाचे हे माध्यम असून प्रतिसाद देण्याच्या माध्यमातून शासन यामध्ये जनतेप्रती दायित्व पूर्ण करते. प्रतिसादाची हमी हे पोर्टलचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक विभागाचा एक अधिकारी या संदर्भात जबाबदार असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य माणसाला शासकीय कार्यालयांचे हेलपाटे करावे लागणार नाहीत.
                                             000000

शनिवार, २३ जानेवारी, २०१६

एस.टी. महामंडळ आणि परिवहन विभागाच्या विविध योजना जाहीर आज होणार लोकार्पण

          मुंबई, दि. 23 : राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ व  लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्द्वव ठाकरे  यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हा लोकार्पण सोहळा शनिवार 23 जानेवारी 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता  मुंबई सेंट्रल येथील एस.टी.महामंडळाच्या आगारात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना
          एस.टी. महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या आर्थिक भवितव्यासाठी ही योजना सुरु करण्यात येणार असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलीला तिच्या वयाच्या 21 व्या वर्षी विवाहासाठी रुपये 1 लाख दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2016 पासून पुढे जन्मास येणाऱ्या कन्यांच्या नावे एसटी महामंडळातर्फे रु. 17 हजार 500 इतकी रक्कम मुदत अथवा दामदुप्पट योजनेत एस.टी बँकेत ठेवण्यात येईल.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजना
            या योजनेअंतर्गत रा.प. बसेसच्या अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसास दहा लाख रुपये, कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीला पाच लाख  रुपये, अंशत:विकलांग झालेल्या व्यक्तिस रु. दोन लाख पन्नास हजार व तात्पुरते अपंगत्व आलेल्या व्यक्तिस एक लाख रुपये, देण्यात येणार आहेत. या योजनेस लागणारा निधी निर्माण करण्यासाठी रा.प. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सरसकट टिकीटावर एक रुपये नाममात्र अधिभार आकारण्यात येणार आहे. “एक रुपयात दहा लाखाचा विमा” असे योजनेचे स्वरुप असणार आहे.
            हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना
            या योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कर्ता पुरुष मयत झाल्यामुळे अशा कुटुंबास कायमस्वरुपी उपजिवेकेचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने परिवहन विभागातर्फे मयत शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना विशेष बाब म्हणून ऑटोरिक्षा परवाने देण्यात येणार आहेत तसेच ऑटोरिक्षा करिता 100 टक्के कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. ऑटोरिक्षा परवाना धारकांकडे परवाना व बॅच असणे आवश्यक आहे. तथापि या योजनेद्वारे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे.
शिवशाही बस सेवा
            एस.टी.महामंडळातर्फे सामान्य जनतेला “शिवशाही” बस प्रकल्पाद्वारे सुरक्षित आणि सुखकर प्रवास उपलब्ध होणार आहे. सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या व्यवहार्य दरामध्ये 500 वातानुकुलीत बसेस सुरु केल्या जाणार असून या बसेस एप्रिल 2016 पर्यंत प्रवाशांच्या सेवेसाठी महामंडळाच्या ताफ्यात होणार आहेत. वाढत्या खाजगी वाहतूकीला शह देण्यासाठी तसेच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी या गाड्यांमध्ये अत्यंत आरामदायी आसने,वाचनासाठी दिवे, सी.सी.टी.व्ही., वाय-फाय, जीपीएस, मोबाईल व लॅपटॉप चार्जर्सची सोय असणार आहे त्याचबरोबर आसनाला व शयनयानाला 9 इंची एलईडी स्क्रीन असणार आहे. या बसेस मराठवाडा, विदर्भ, कोकणातील प्रवाशांना व राज्यातील सर्व प्रमुख शहरांशी जोडतील अशा पध्दतीने वेळापत्रक तयार करण्यात येत आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अतिविशेषोपचार रुग्णालय
        एस.टी.महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने त्यांना उच्च दर्जाची व अतिविशेष सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पुणे येथील मध्यवर्ती ठिकाणी महामंडळाचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा, चाचण्या व तपासण्या करण्याची सोय असणार असून बाह्य रुग्ण उपचार, अपघात विभाग, हृदयविकार उपचार विभाग, अतिदक्षता विभाग, रक्त तपासणी, रक्त पेढी, सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग आदी सुविधा असणार आहेत. या रुग्णालयाची उभारणी बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर वापरण्यात येणार असून 100 खाटांच्या या रुग्णालयामध्ये एस.टी. महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी 25 टक्के खाटांचे आरक्षण देऊन त्यांना मोफत उपचार देणे बंधनकारक असणार आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय
        राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एकूण सुमारे अठरा हजार बसेस राज्यभरात विविध मार्गावर प्रवासी वाहतूक करत असतात. बसेसच्या दैनंदिन दुरुस्ती व देखभालीसाठी राज्यात 250 आगार कार्यशाळा आणि विशेष दुरुस्तीसाठी बसेस बांधणीसाठी 3 मध्यवर्ती कार्यशाळांची आस्थापना आहे. व्यवस्थापन कोटा राखीव ठेवल्यास या कार्यशाळांमध्ये ऑटोमोबाईल इंजिनियरची आवश्यकता असून महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना स्वयंचलन अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यासाठी नवी मुंबई येथील महामंडळाच्या जागेमध्ये ए.आय.सी.टी.ई. च्या निकषानुसार प्रतीवर्षी 60 प्रवेश याप्रमाणे 240 विद्यार्थी क्षमता असलेले स्वयंचलीत अभियांत्रिकी (ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग) वाहने महाविद्यालय वसतीगृहासह उभारण्याचे प्रस्तावित आहे.
            नवीन रिक्षा परवान्यासाठी ऑनलाईन लॉटरीत महिलांना 5 टक्के आरक्षित
          राज्य नवीन रिक्षा परवान्यासाठी ऑनलाईन लॉटरीत महिलांना 5 टक्के आरक्षित करण्यात आले असून महिलांकरीता “अबोली रंगाची रिक्षा” सुनिश्चित करण्यात आले आहे. परवान्यांसाठी पुरेशा महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास हे परवाने राखीव ठेवून जशा महिला उपलब्ध होतील तसे त्यांना “First come First serve” या तत्वावर जारी करण्यात येणार आहेत.
या लोकार्पण सोहळ्या दरम्यान राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहून एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने जमा केलेले एक दिवसाचे वेतन “6 कोटी 26 लाख 31 हजार 489” मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द करण्यात येणार आहे.

बुधवार, ६ जानेवारी, २०१६

दर्पण दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करताना

दर्पण दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, पत्रकार विजय जोशी, सखाराम कुलकर्णी, विजय बंडेवार, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, माहिती अधिकारी निशिकांत तोडकर, छायाचित्रकार विजय होकर्णे, एस. जी. शेळके, शिवा आरेवार, श्यामराव सुर्यवंशी, महमंद युसूफ, सी. पी. आराध्ये, सेवानिवृत्त माहिती सहाय्यक र. रा. ताटीकोंडलवार, नरेंद्र हुगे, विलास दाढे आदी उपस्थित होते.  








मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

छायाचित्रकार विजय होकर्णे यांचा माहिती कार्यालयात सत्कार संपन्न

नांदेड, दि. 17 :- राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारातील सन 2014 चा राज्यस्तरीय उत्कृष्ट छायाचित्रकार केकी मुस पुरस्कार मिळाल्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार विजय होकर्णे यांचा जिल्हा माहिती कार्यालय नांदेडच्यावतीने येथे नुकताच सत्कार करण्यात आला.
जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन श्री. होकर्णे यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच श्री. होकर्णे यांच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी माहिती अधिकारी निशिकांत तोडकर, कार्यालयातील लिपीक श्रीमती अलका पाटील, काशिनाथ आरेवार, एस. सी. सुर्यवंशी, बालअंगली नरसय्या तसेच निवृत्ती माहिती सहायक आर. आर. ताटीकोंडलवार आदी उपस्थित होते.
                                         000000
दि. 17.12.2015