‘आपले सरकार’ वेब पोर्टलच्या माध्यमातून
राज्यातील प्रशासन ‘ऑनलाईन प्रजासत्ताक’!
मुंबई, दि. 25 : सर्वसामान्य नागरीकांच्या मंत्रालय स्तरावरील प्रशासकीय तक्रारींचे
निवारण करण्यासाठी गेल्यावर्षी 26 जानेवारीला सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ या
वेब पोर्टलच्या माध्यमातून यंदाच्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील
सेवा उपलब्ध होणार आहेत. अवघ्या वर्षभरातच संपूर्ण राज्यासाठी सेवा प्रदान करणारे
हे पोर्टल नागरीकांसाठी खऱ्या अर्थाने लोकाभिमुख प्रशासनाचे माध्यम ठरणार आहे.
या पोर्टलद्वारे गेल्या 15 ऑगस्टला सहा जिल्ह्यांसाठी तक्रार निवारण
प्रणाली उपलब्ध करण्यात आली होती. त्यानंतर पाच महिन्यातच राज्यातील सर्व
जिल्ह्यांसाठी ही सेवा उपलब्ध करून ऑनलाईन प्रशासनासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण
पाऊल टाकले आहे.
नागरीकांना ऑनलाईन आणि सुलभतेने तक्रारी सादर करता याव्यात, यासाठी
शासनातर्फे गेल्या प्रजासत्ताकदिनी ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू करण्यात आले. या पोर्टलच्या
माध्यमातून संपूर्ण राज्यातील विविध प्रकारच्या प्रशासकीय सेवा आता उपलब्ध होतील.
येत्या 26 जानेवारीला या महत्त्वपूर्ण टप्प्यास प्रारंभ होणार असून त्यामुळे जिल्ह्यातील
शासकीय कार्यालयातील कामकाज पेपरलेस व डिजीटल होण्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण
पाऊल टाकले जाणार आहे. यामुळे नागरीकांना संबंधित विभागाकडे तक्रारी करणे सुलभ
होणार असून तक्रार दाखल करण्याविषयी माहिती, त्यावरील कार्यवाही, लागणारा कालावधी
आदी माहितीही त्याला याच पोर्टलच्या माध्यमातून मिळणार आहे. या यंत्रणेत नागरीकांकडून
दाखल झालेल्या तक्रारींच्या कार्यवाहीचा पाठपुरावा मुख्यमंत्री कार्यालय करणार आहे.
आपले सरकार हे वेबपोर्टल म्हणजे डिजीटल महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले एक
पाऊल आहे. राज्य शासनाने 2015 हे वर्ष डिजीटल वर्ष म्हणून साजरे केले आहे. डिजीटल
महाराष्ट्र मोहिमेंतर्गत हा प्रयत्न सुरू झाला असून पारदर्शकता आणि गतिमानतेतून
सुशासन देणे शक्य झाले. तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला घरपोच सेवा देण्याचा हा
प्रयत्न आहे.
लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध विभागांच्या 252 सेवा अधिसूचित करण्यात आल्या
आहेत. त्यापैकी 47 सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. 26 जानेवारीपासून 150 हून अधिक सेवा ऑनलाईन करण्यात येणार
आहेत.
वेब पोर्टलवर तक्रार दाखल करताना जिल्हा, विषय, तक्रारीचे स्वरूप, संबंधित विभाग,
प्रशासन प्रकार आदी माहिती दिल्यानंतर नागरीकांना तक्रारीसोबत कागदपत्रेही जोडता
येतील. या प्रक्रियेसाठी तक्रारदाराचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक आवश्यक राहणार
आहे. तक्रार दाखल करण्यासाठी वन टाइम पासवर्ड मिळेल. तसेच तक्रार नोंदविल्यानंतर मिळणाऱ्या
टोकन आयडीचा वापर करून तक्रारींचा मागोवा घेता येणार आहे. पोर्टलवर तक्रार निवारण,
सेवा हमी, माहितीचा अधिकार आणि सहयोग असे चार विभाग असून जिल्हाधिकारी कार्यालय,
जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, महापालिका अशा चार कार्यालयांशी संबंधित
तक्रारी करता येऊ शकतील. या पोर्टलशी सर्व यंत्रणा जोडल्या असल्याने ही तक्रार संबंधित
कार्यालयाबरोबरच वरिष्ठ स्तरावरील अधिकारी पाहू शकतील. तक्रारीबाबत झालेली कार्यवाही
संबंधितांना 21 दिवसाच्या आत कळणार आहे.
सदर प्रणालीस नागरीकांचा तसेच प्रशासनाचा अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद
मिळाला असून पोर्टलच्या सुरवातीपासून 25 जानेवारी 2016 पर्यंत एकूण 23 हजार 838 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 81 टक्के
तक्रारीचे निराकरण झाले आहे.
आपले सरकार या संकेतस्थळावर जाण्यासाठी www.aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाणे आवश्यक आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत
हे वेबपोर्टल उपलब्ध आहे. या वेबपोर्टलमुळे माहितीचा कायदा ऑनलाईन करणारे
महाराष्ट्र हे पहिले राज्य झाले आहे. या कायद्याचा वापर करताना कोर्ट फी स्टॅम्प
वापरावे लागत होते. आता आपल्या बँक अकाऊंटमधून आवश्यक असलेले शुल्क इंटरनेट
बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांचा वापर करून भरता येईल. तसेच ‘आपले सरकार’
हे मोबाईल अॅप्लिकेशन ॲन्ड्रॉईड आयफोन आणि विन्डोजवरून डाऊनलोड करता येणार आहे.
राज्यातील जनतेचा थेट वरिष्ठांपर्यंत संपर्क साधणारी ही ऑनलाइन व्यवस्था
आहे. मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून दुहेरी संवादाचे हे माध्यम असून
प्रतिसाद देण्याच्या माध्यमातून शासन यामध्ये जनतेप्रती दायित्व पूर्ण करते.
प्रतिसादाची हमी हे पोर्टलचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक विभागाचा एक अधिकारी या
संदर्भात जबाबदार असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य माणसाला शासकीय
कार्यालयांचे हेलपाटे करावे लागणार नाहीत.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा