मुंबई, दि. 23 : राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकोपयोगी योजनांचा
शुभारंभ व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्द्वव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हा लोकार्पण सोहळा शनिवार 23 जानेवारी
2016 रोजी सकाळी 9.30 वाजता मुंबई सेंट्रल येथील एस.टी.महामंडळाच्या
आगारात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज पत्रकार परिषदेत
दिली.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना
एस.टी. महामंडळाच्या
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या आर्थिक भवितव्यासाठी ही योजना सुरु करण्यात
येणार असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलीला तिच्या वयाच्या 21 व्या वर्षी
विवाहासाठी रुपये 1 लाख दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2016 पासून
पुढे जन्मास येणाऱ्या कन्यांच्या नावे एसटी महामंडळातर्फे रु. 17 हजार 500 इतकी
रक्कम मुदत अथवा दामदुप्पट योजनेत एस.टी बँकेत ठेवण्यात येईल.
हिंदूहृदयसम्राट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजना
या योजनेअंतर्गत
रा.प. बसेसच्या अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसास दहा लाख रुपये, कायमचे अपंगत्व
आलेल्या व्यक्तीला पाच लाख रुपये, अंशत:विकलांग झालेल्या व्यक्तिस रु.
दोन लाख पन्नास हजार व तात्पुरते अपंगत्व आलेल्या व्यक्तिस एक लाख रुपये, देण्यात येणार आहेत.
या योजनेस लागणारा निधी निर्माण करण्यासाठी रा.प. बसमधून प्रवास करणाऱ्या
प्रवाशांच्या सरसकट टिकीटावर एक रुपये नाममात्र अधिभार आकारण्यात येणार आहे. “एक रुपयात दहा लाखाचा विमा” असे योजनेचे स्वरुप असणार आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
निराधार स्वावलंबन योजना
या योजनेअंतर्गत
आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कर्ता पुरुष मयत झाल्यामुळे अशा कुटुंबास कायमस्वरुपी
उपजिवेकेचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने परिवहन विभागातर्फे मयत शेतकऱ्यांच्या
विधवा महिलांना विशेष बाब म्हणून ऑटोरिक्षा परवाने देण्यात येणार आहेत तसेच
ऑटोरिक्षा करिता 100 टक्के कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. ऑटोरिक्षा परवाना
धारकांकडे परवाना व बॅच असणे आवश्यक आहे. तथापि या योजनेद्वारे आत्महत्या केलेल्या
शेतकऱ्यांच्या विधवांसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे.
शिवशाही बस सेवा
एस.टी.महामंडळातर्फे
सामान्य जनतेला “शिवशाही” बस प्रकल्पाद्वारे सुरक्षित आणि सुखकर प्रवास उपलब्ध होणार आहे. सामान्य
नागरिकांना परवडणाऱ्या व्यवहार्य दरामध्ये 500 वातानुकुलीत बसेस सुरु केल्या जाणार
असून या बसेस एप्रिल 2016 पर्यंत प्रवाशांच्या सेवेसाठी महामंडळाच्या ताफ्यात
होणार आहेत. वाढत्या खाजगी वाहतूकीला शह देण्यासाठी तसेच प्रवाशांना आकर्षित
करण्यासाठी या गाड्यांमध्ये अत्यंत आरामदायी आसने,वाचनासाठी दिवे, सी.सी.टी.व्ही., वाय-फाय, जीपीएस, मोबाईल व लॅपटॉप
चार्जर्सची सोय असणार आहे त्याचबरोबर आसनाला व शयनयानाला 9 इंची एलईडी स्क्रीन
असणार आहे. या बसेस मराठवाडा, विदर्भ, कोकणातील प्रवाशांना व राज्यातील सर्व
प्रमुख शहरांशी जोडतील अशा पध्दतीने वेळापत्रक तयार करण्यात येत आहे.
हिंदूहृदयसम्राट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अतिविशेषोपचार रुग्णालय
एस.टी.महामंडळातील
कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने त्यांना उच्च दर्जाची व
अतिविशेष सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पुणे येथील मध्यवर्ती ठिकाणी महामंडळाचे
अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या वैद्यकीय
सुविधा, चाचण्या व तपासण्या करण्याची सोय असणार असून बाह्य रुग्ण उपचार, अपघात विभाग, हृदयविकार उपचार
विभाग, अतिदक्षता विभाग, रक्त तपासणी, रक्त पेढी, सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग आदी सुविधा
असणार आहेत. या रुग्णालयाची उभारणी बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर
वापरण्यात येणार असून 100 खाटांच्या या रुग्णालयामध्ये एस.टी. महामंडळाच्या
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी 25 टक्के खाटांचे आरक्षण देऊन त्यांना
मोफत उपचार देणे बंधनकारक असणार आहे.
हिंदूहृदयसम्राट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय
राज्य मार्ग परिवहन
महामंडळाच्या एकूण सुमारे अठरा हजार बसेस राज्यभरात विविध मार्गावर प्रवासी वाहतूक
करत असतात. बसेसच्या दैनंदिन दुरुस्ती व देखभालीसाठी राज्यात 250 आगार कार्यशाळा
आणि विशेष दुरुस्तीसाठी बसेस बांधणीसाठी 3 मध्यवर्ती कार्यशाळांची आस्थापना आहे.
व्यवस्थापन कोटा राखीव ठेवल्यास या कार्यशाळांमध्ये ऑटोमोबाईल इंजिनियरची आवश्यकता
असून महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना स्वयंचलन अभियांत्रिकीचे शिक्षण
देण्यासाठी नवी मुंबई येथील महामंडळाच्या जागेमध्ये ए.आय.सी.टी.ई. च्या निकषानुसार
प्रतीवर्षी 60 प्रवेश याप्रमाणे 240 विद्यार्थी क्षमता असलेले स्वयंचलीत
अभियांत्रिकी (ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग) वाहने महाविद्यालय वसतीगृहासह उभारण्याचे
प्रस्तावित आहे.
नवीन रिक्षा परवान्यासाठी ऑनलाईन लॉटरीत महिलांना 5
टक्के आरक्षित
राज्य नवीन रिक्षा परवान्यासाठी ऑनलाईन
लॉटरीत महिलांना 5 टक्के आरक्षित करण्यात आले असून महिलांकरीता “अबोली रंगाची रिक्षा” सुनिश्चित करण्यात आले आहे.
परवान्यांसाठी पुरेशा महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास हे परवाने राखीव ठेवून जशा
महिला उपलब्ध होतील तसे त्यांना “First come First serve” या तत्वावर जारी करण्यात येणार आहेत.
या लोकार्पण सोहळ्या दरम्यान राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहून एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी
संवेदनशीलतेने जमा केलेले एक दिवसाचे वेतन “6 कोटी 26 लाख 31 हजार 489” मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा