‘लोकराज्य’ भारतातील तिसऱ्या तर
महाराष्ट्रातील
पहिल्या क्रमांकाचे मासिक
‘एबीसी’कडून शिक्कामोर्तब
मुंबई, दि. 7 : शासन आणि जनता
यांच्यातील दुवा म्हणून काम करत महत्त्वपूर्ण माहिती जनसामान्यांपर्यंत
पोहोचविण्याची प्रदीर्घ परंपरा असलेले ‘लोकराज्य’ मासिक आता ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (एबीसी) च्या नुकत्याच
झालेल्या सर्वेक्षणानुसार देशात तिसऱ्या क्रमांकाचे मासिक ठरले आहे. महाराष्ट्राचे
प्रथम क्रमांकाचे मासिक म्हणूनही ‘लोकराज्य’ने आपली परंपरा कायम ठेवली आहे. जागरण जोश प्लस (हिंदी), वनिथा (मल्याळम) या
पहिल्या दोन क्रमांकाच्या मासिकानंतर तिसऱ्या क्रमांकाचा खप असलेल्या मासिकाचा मान
मराठी लोकराज्यने प्राप्त केला आहे.
शासनाची अधिकृत आणि
वस्तुनिष्ठ माहिती, आकर्षक मांडणी, रंगीत छपाई, उच्च प्रतीचा कागद ही लोकराज्यची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
वाचनीयता आणि माहिती याची उत्तमरित्या सांगड लोकराज्यने घातली आहे. माहितीचा खजिना
असलेले लोकराज्य हे संघ लोकसेवा आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा
देणाऱ्या उमेदवारांचे सर्वाधिक पसंतीचे मासिक आहे. निरामय,
संस्कृती,
प्रेरणा,
भ्रमंती,
दिल्लीतील महाराष्ट्र, महाराष्ट्राचे गडकिल्ले, यशकथा, एक दिवस मंत्र्यांसोबत
यासारखी सदरे मोठा वाचनानंद देण्यास यशस्वी ठरली आहेत.
लोकराज्यच्या
यशस्वी वाटचालीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर व
महासंचालक चंद्रशेखर ओक, संचालक देवेंद्र भुजबळ,
शिवाजी मानकर आणि महाराष्ट्रातील महासंचालनालयाच्या सर्व
अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून गेल्या अनेक वर्षांपासून खप आणि दर्जा
राखण्यात ‘लोकराज्य’ला यश आले आहे.
००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा