शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०१५

केंद्रीय पथक दाखल

औरंगाबाद,‍ दि. 19 : औरंगाबाद आणि नाशिक महसूल विभागातील टंचाईसदृश्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या पथकाचे आज सायंकाळी येथे आगमन झाले.
केंद्रीय कृषी मंत्रालयातील आयुक्त डॉ. एस. के. मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या एका बैठकीत परिस्थितीची माहिती घेतली.  सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत राज्य शासनाचे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, औरंगाबाद विभागाचे महसूल आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी राज्य तसेच संबंधित विभागातील खरीप तसेच रब्बी हंगाम, चालू वर्षातील आजवरचा पाऊस, अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती, पाणीसाठा, भुगर्भातील पाणीपातळी या बाबींची तसेच पाणीपुरवठ्यासाठीच्या उपाययोजना आणि मराठवाडा विभागातील तीन जिल्हयात सध्या सुरु असलेल्या गुरांच्या छावण्यांची माहिती दिली. 
डॉ. मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकात कापूस विकास संचनालयातील संचालक डॉ. आर. पी. सिंग, केंद्रीय उर्जा मंत्रालयातील वीज प्राधिकरणाचे उपसंचालक शंतनु विश्वास, निती आयोगातील उपसल्लागार मानस चौधरी, केंद्रीय अन्न धान्य महामंडळातील वरिष्ठ अधिकारी एम. एम. बोऱ्हाडे, केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयातील वरिष्ठ सहआयुक्त सतीश कामभोज, केंद्रीय पशुसंर्वधन विभागातील सहाय्यक आयुक्त डॉ. एच. आर. खन्ना, केंद्रीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयातील अवर सचिव के. नारायण रेड्डी, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयातील सहाय्यक आयुक्त जगदीश कुमार आणि केंद्रीय वित्त मंत्रालयातील उपसंचालक ए. के. दिवाण यांचा समावेश आहे.
या पथकातील विविध सदस्य शुक्रवार,दि. 20 आणि शनिवार,दि.21 नोव्हेंबर रोजी मराठवाडा विभागातील आठ जिल्हयांचा तसेच नाशिक विभागातील बुलढाणा, जळगांव, धुळे, नाशिक आणि अहमदनगर जिल्हयांचा दौरा करणार असून परिस्थितीची पाहणी करणार आहेत.  दौऱ्यासाठी पथकाच्या चार तुकड्या करण्यात आल्या आहेत.
आज रात्री झालेल्या बैठकीला औरंगाबादच्या जिल्हाधिकारी डॉ. निधी पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक सुहास दिवसे, महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, बुलढाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासह कृषी, पशुसंर्वधन, भुजलसर्वेक्षण आदि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: