शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

केंद्रीय पथकाचा पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांशी आस्थेवाईक संवाद

नांदेड, दि. 21 - जिल्ह्यातील पर्जन्यमान, टॅंकरने पाणी पुरवठा सुरु असलेली गावे तसेच पीक परिस्थिती याबाबत केंद्रीय पाहणी पथकाने आज जिल्ह्यातील कंधार, लोहा तालुक्यातील गावांत पाहणी केली, तसेच शेतकरी, नागरिकांशी आस्थेवाईक संवादही साधला. या पथकाने आज शनिवारी सकाळी नांदेड जिल्ह्यातील पाहणीसाठी दौरा केला.

या पथकात नवी दिल्लीतील  जलसंशोधन संस्थेचे वरीष्ठ सहायक आयुक्त सतिश कामभोज, भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) मुंबई क्षेत्रीय कार्यालयातील उपमहाव्यवस्थापक एम. एम. बोऱ्हाडे तसेच औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (सा.प्र.) विजयकुमार फड यांचा समावेश होता. या पथकासमेवत जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. टी. एस. मोटे, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, अश्विनी पाटील यांच्यासह कृषी, जलसंपदा, पशूसंवर्धन, भूजल सर्वेक्षण आदी विभागांच्या अधिकारी यांचीही उपस्थिती होती.
पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी कंधार येथे जगतूंग तलाव, तसेच मन्याड नदी बंधारास्थळी पथकातील सदस्यांशी संवाद साधला. प्राचीन जगतूंग तलावाची भौगोलीक रचना, परिसरातील पर्जन्यमान आणि पाणीस्थिती याबाबतची माहिती पथकातील सदस्यांनी घेतली. बहादुरपूरा येथील नागरिकांशीही सदस्यांनी संवाद साधला, यावेळी सरपंच माधव पेटकर यांनी गावासाठी उपलब्ध जलस्त्रोत, पाणीसाठा याबाबत माहिती दिली. वाटेत फुलवळ येथील नागरिकांचे म्हणणेही पथकाने ऐकून घेतले.  तेथून पुढे डिग्रज येथील शिवारात पथकाने भेट दिली. डिग्रज बुद्रूक येथील आप्पाराव शिंदे यांच्या शिवारातील हळद पीकाची माहिती पथकाने घेतली. विश्वंभर जयंतराव पाटील यांच्या फळबाग, कपाशीची पथकाने माहिती घेतली. कुरुळा-माळाकोळीच्या वाटेवर उमरगा-खोजण गावातील तिरुपती केंद्रे, मारूती केंद्रे यांच्या शिवारातही पथकाताली सदस्यांनी आणि अधिकाऱ्यांनी संवाद साधला. माळाकोळी येथे वैजनाथ तिडके यांच्या शेतातील हळद, तूर पीकांचीही माहिती पथकाने घेतली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना पथकातील सदस्यांनी पेरा, उपलब्ध पाणीसाठा, पिकांची स्थिती, उत्पन्न आदींबाबत तपशीलवार चर्चा केली.
दरम्यान, केंद्रीय पथकाचे शुक्रवार 20 नोव्हेंबर,2015 रोजी सायंकाळी आगमन झाले होते, यादिवशी जिल्हाधिकारी श्री. काकाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काळे यांनी जिल्ह्यातील स्थितीबाबत सादरीकरणाद्वारे पर्जन्यमान, पीक परिस्थिती, पाणी पुरवठा याबाबत माहिती दिली. पाहणी दौऱ्यात सहभागी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनीही पथकातील सदस्यांना पीक, पाणी आणि उत्पन्नाबाबतची प्रत्यक्ष माहिती दिली. नागरिकांनीही पथकातील सदस्यांशी मोकळेपणाने संवाद साधला.

000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: