शुक्रवार, २२ एप्रिल, २०१६

पर्यावरण बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी
 वृक्ष लागवड अत्यावश्यक - काकाणी
जिल्ह्यात सात लाख 91 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट

नांदेड दि. 22 :- तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी, दुष्काळ या पर्यावरणीय बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी शासनाच्या विविध कार्यालयांनी लोकसहभागातून येत्या पावसाळ्यात 1 जुलै रोजी वन महोत्सव कालावधीत वृक्ष लागवडीचे नियोजन करावे व  त्यांच्या संगोपनासाठीही काटेकोर दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज केले.    
शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहभागातून जिल्ह्यात येत्या पावसाळ्यात 1 ते 7 जुलै 2016 या कालावधीतवनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 1 जुलै रोजी या एकाच दिवशी सात लाख 91 हजार वृक्ष रोप लागवडीचे उद्दीष्ट हाती घेण्यात आले असून याविषयी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.  
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, सहायक जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक तथा समितीचे सदस्य सचिव सुर्यकांत मंकावार, जिल्हा वनसंरक्षक सुजय डोडल यांच्यासह संबंधीत विभागाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.  
जिल्हाधिकारी श्री. काकाणी पुढे म्हणाले की , वन महोत्सव कालावधीत वृक्षलागवड करताना नियमांचे बंधन लक्षात घेऊन विविध विभागांनी वृक्षाची लागवड करावी. त्यासाठी संबंधीत विभागाचे मार्गदर्शन घ्यावे. जलयुक्त शिवार अभियानाइतकेच  वृक्षाची लागवड करणे महत्वाचे झाले आहे. भविष्यातील वातावरण निरोगी राहून नागरिकांचे आरोग्य चांगले, समाधानी राहण्यास वृक्ष लागवडीची मोठी मदत होणार आहे. जिल्ह्यातील विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रुग्णालये, ग्रामपंचायती,  कारखाने, न्यायालये, शेतीबांध, स्मशानभुमी आदी ठिकाणी  जागेचे नियोजन करुन मोठ्या प्रमाणात रोपे लावता येतील. शासकीय जागेवरील रोपांची  व्यवस्था, संगोपन, पालकत्व संबंधीत कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या ठिकाणी वृक्ष लागवड करता येतील तेथे त्याठिकाणी प्रयत्न करावेत. जिल्ह्याला दिलेले वृक्षलागवडीचे उद्दीष्ट लक्षात घेऊन त्यापेक्षाही जास्त वृक्ष लावली तर पर्यावरण संरक्षणासाठी  फायदाचे  राहील. लोकसहभागातून  मोठ्या प्रमाणात चांगली कामे होतात. त्याद्वारे जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्याचे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी जिल्ह्यात 1 जुलै रोजी एकाच दिवशी दिलेल्या रोप लागवडीच्या उद्दीष्टाची माहिती संबंधित विभागांना दिली. त्यात वन विभाग 4 लाख 80 हजार, सामाजिक वनीकरण 15 हजार, वनविकास महामंडळ किनवट 10 हजार असे 5 लाख 5 हजार तर या व्यतिरिक्त जिल्ह्यातील विविध विभागांना 2 लाख 86 हजार अशी जिल्ह्यात एकूण 7 लाख 91 हजार रोपे लागवड करण्याबाबतचे हे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.   
 वन महोत्सवाची पार्श्वभुमी स्पष्ट करताना सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक तथा सदस्य सचिव श्री. मंकावार म्हणाले की, मनुष्य वृक्षाशिवाय जगू शकत नाही. वातावरणातील बदलामुळे  विविध देशात वृक्षाची लागवड करण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांना, संस्था, मंडळे, आदींनी महसूल व वन विभागाचा 31 मार्च 2016 रोजीच्या शासन निर्णयान्वये वन महोत्सव कालावधीत 1 जुलै रोजी वृक्षाची लागवड करुन प्रभावी सहभाग नोंदवावा, असे  आवाहनही त्यांनी यावेळी केले. बैठकीत सामाजिक वनीकरण विभागाच्या सहायक संचालक श्रीमती पारधी यांनी वन महोत्सव  विषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.   

00000000
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

लोकहिताच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
शासकीय सेवाप्रवेशाच्या वयोमर्यादेत वाढीसह
ग्रामीण भागासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना

    मुंबई, दि. 22 : राज्यातील विविध घटकांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे निर्णय राज्य मंत्रिमंडळाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत घेतले आहेत. शासकीय सेवेतील प्रवेशासाठीच्या कमाल वयोमर्यादेत 5 वर्षाने वाढ, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, वस्त्रोद्योग प्रकल्पांना व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान, पारंपरिक देशी बीजांच्या संवर्धन व जतनासाठी जीन बँकेचे बळकटीकरण असे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्य शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जिल्हा निवड समित्या आणि विविध मंत्रालयीन विभागांनी नियुक्त केलेल्या निवड समित्यांमार्फत शासन सेवा प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या निरनिराळ्या पदासाठीच्या स्पर्धा परीक्षांसाठी असणाऱ्या उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेत 5 वर्षाने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही लवकरच जारी करण्यात येत आहे.
या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सध्या असलेली कमाल वयोमर्यादा 33 वरून 38 वर्षे होणार असून मागासवर्गीय उमेदवारांसाठी सध्याची 38 वर्षांची वयोमर्यादा आता 43 वर्षे होणार आहे. याशिवाय सध्याच्या ज्या प्रवर्ग किंवा घटकांची कमाल वयोमर्यादा 43 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात येणार नाही.

 मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम
ग्रामीण भागातील दीर्घकालीन गरजांचा विचार करून तेथील जनतेला पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी 2016 ते 2020 या कालावधीत राज्याचा स्वत:चा मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ग्रामीण भागामध्ये हा कार्यक्रम आवश्यकतेनुसार राबविण्यात येणार असून त्यावर पुढील चार वर्षात 2500 कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील दुष्काळजन्य परिस्थिती हाताळण्यास मदत होणार आहे.
राज्यात केंद्र तसेच राज्य शासनाच्या मागणी आधारित धोरणांतर्गत अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. राज्यात प्रगतीपथावर असलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यास केंद्र शासनाने प्राधान्य देण्याचे सूचित केले आहे. तथापि, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून नवीन योजनांसाठी केंद्र शासनाने तूर्तास बंद केलेले निधी वितरण आणि राज्याचे केंद्र शासनावर असलेले अवलंबित्व या बाबींचा विचार करता पिण्याच्या स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्यासाठी राज्याचा स्वत:चा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळेच ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याची गरज भागविण्यासह पिण्याच्या पाण्यासंदर्भातील सर्व प्रश्न प्रभावीपणे सोडविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम स्वतंत्ररित्या राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे प्रामुख्याने तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत हाती घ्यावयाच्या नवीन योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे पुनरूज्जीवन आणि प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरूस्ती यांचा समावेश आहे.

वस्त्रोद्योग प्रकल्पांना भांडवली अनुदान, मराठवाडा व विदर्भाला विशेष फायदा
प्रशासकीय सुलभीकरणाच्या दृष्टीने वस्त्रोद्योग प्रकल्पांना व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यादृष्टीने वस्त्रोद्योग धोरण 2011-17 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला असून हा निर्णय इज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या योजनेच्या लाभासाठी वर्षातून एकदाच अर्ज करावा लागणार आहे.
विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या कापूस उत्पादक क्षेत्रातील वस्त्रोद्योग प्रकल्पांना अतिरिक्त 10 टक्के भांडवली अनुदान देण्याची सध्याची योजना कायम राहणार आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना विशेषत्वाने होणार आहे.
वस्त्रोद्योग प्रकल्पांना वस्त्रोद्योगाच्या प्रकारानुसार व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान देण्यात येणार आहे. सुतगिरणी, गारमेंटिंग, जिनिंग-प्रेसिंग व प्रोसेसिंग या वस्त्रोद्योग घटकांना टीयुएफएस (TUFS) असंलग्न योजनेतील व्याज दर 7 टक्के असताना भांडवली अनुदानाचा दर पात्र रकमेच्या 35 टक्के राहणार आहे. टेक्निकल टेक्सटाईल्स, कंपोझिट युनिट या वस्त्रोद्योग घटकासाठी टीयुएफएस (TUFS) असंलग्न योजनेतील व्याज दर 6 टक्के असताना भांडवली अनुदानाचा दर पात्र रकमेच्या 30 टक्के राहणार आहे. तसेच अन्य वस्त्रोद्योग घटकांसाठी टीयुएफएस (TUFS) असंलग्न योजनेतील व्याज दर 5 टक्के असताना भांडवली अनुदानाचा दर पात्र रकमेच्या 25 टक्के राहणार आहे.
या निर्णयानुसार टीयुएफएस (TUFS) च्या निकषानुसार बँकांनी दीर्घ मुदत कर्ज मंजूर केलेले वस्त्रोद्योग प्रकल्प व्याज सवलती ऐवजी भांडवली सवलतीस पात्र राहतील. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील प्रकल्पांना भांडवली अनुदान देण्यासाठी वस्त्रोद्योग प्रकल्पाचे मूल्यांकन, प्रकल्प मंजूर करण्याची कार्यपद्धती, प्रकल्प मंजुरीसाठी तांत्रिक निकष, ऑनलाईन सनियंत्रण यासाठी असणारी प्रचलित पद्धत किंवा नियमावली या बाबींचा अवलंब करण्यात येतो. वस्त्रोद्योगांना व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान देण्यासाठी याच पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या कापूस उत्पादक क्षेत्रातील वस्त्रोद्योग प्रकल्प पूर्ण होऊन तो उत्पादनाखाली आल्यानंतर त्यांना एकूण देय अनुदानाच्या 15 टक्के एवढा भांडवली अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात येईल. तसेच वस्त्रोद्योग संचालकांनी प्रकल्प पुढे चालू असल्याबाबतचे दरवर्षी प्रमाणित केल्यानंतर उर्वरित अनुदान पुढील सहा समान हप्त्यात देण्यात येईल. त्याचप्रमाणे विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या कापूस उत्पादक क्षेत्राबाहेरील वस्त्रोद्योग प्रकल्प पूर्ण होऊन तो उत्पादनाखाली आल्यानंतर भांडवली अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात येईल आणि वस्त्रोद्योग संचालकांनी प्रकल्प पुढे चालू असल्याबाबतचे दरवर्षी प्रमाणित केल्यानंतर उर्वरित अनुदान पुढील सहा समान हप्त्यात देण्यात येईल.

जीन बँकेच्या बळकटीकरणाचा निर्णय
          राष्ट्रीय, राज्य व स्थानिक पातळीवरील जैव विविधतेचे संवर्धन करण्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील जीन बँकेचे बळकटीकरण करून जनुकांच्या जतनासाठी येणाऱ्या 10 कोटी इतक्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. संबंधित शासन निर्णय 30 मार्च रोजी काढण्यात आला आहे.
          हवामानातील नैसर्गिक बदलांमुळे विविध गुणधर्म असलेल्या पारंपरिक देशी वाणांचे झपाट्याने निर्मूलन होत आहे. हवामानाच्या बदलांतील जैविक तसेच अजैविक ताणांमुळे पारंपरिक प्रजातींमध्ये अनुवंषिक बदल होत आहेत. त्यामुळे या पारंपरिक देशी वाणांचे बियाणे संग्रहित करून त्यांचे कमी खर्चामध्ये संवर्धन व पृथ:क्करण करण्यासह त्यांच्या अनुवंषिक गुणधर्मांचे जतन करण्यासाठी जीन बँकेचे बळकटीकरण करणे आवश्यक होते. जीन बँकेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अद्ययावत प्रयोगशाळा, शीतगृहे, भांडार, हरितगृहे, काचगृहे इत्यादी सुविधा निर्माण करण्यासह बँकेसाठी लागणारे मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
          जीन बँकेच्या बळकटीकरण करण्याच्या उद्दिष्टामध्ये प्रत्येक पिकाच्या जनुकाचे गुणवत्तेनुसार वर्गीकरण करणे, वर्गीकरणाच्या आधारे विविध पिकांचा दर्जा व उत्पन्नात वाढ करणे, हवामान बदलात अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, आम्ल व क्षारयुक्त जमिनीत तग धरणाऱ्या तसेच किड व रोग प्रतिकारक्षम असणारी जनुके शोधणे, स्थानिक वाणांमध्ये बदल घडवून जैवतंत्रज्ञानाद्वारे अधिक उत्पादन देणारे वाण जलदगतीने विकसित करणे आणि पृथ:क्करण किंवा वर्गीकरण केलेले वाण राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांतील संशोधक व शास्त्रज्ञ यांच्यामार्फत शेतकऱ्यांना गरजेनुसार व वेळेत उपलब्ध करून कृषी विकासाला चालना देणे यांचा समावेश आहे.
-----***-----



गुरुवार, २१ एप्रिल, २०१६

जबाबदारीची भावना, पारदर्शक कामकाजातून
प्रशासनाची विश्वासार्हता वाढेल - काकाणी  
नागरी सेवा दिन साजरा
नांदेड दि. 21 :- जबाबदारीची भावना, पारदर्शक कामकाजातून शिस्तबद्ध नियोजनपूर्ण प्रयत्नातून कामात सातत्य ठेवले तर नागरिकांमध्ये प्रशासनाची विश्वासर्हता वाढिला लागेल, असा विश्वास जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे व्यक्त केला.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे नागरी सेवा दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी बोलत होते. यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी व्ही. एल. कोळी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादनभूभू) श्री. कोकणे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. अवस्थी, सेवानिवृत्त नायब तहसिलदार पी. के. राठोड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.  
जिल्हाधिकारी श्री. काकाणी पुढे म्हणाले की, नागरिकांसाठी राज्य शासनाने माहितीचा अधिकार कायदा”,  सेवा हमी विधेयक कायदा आणला आहे. त्यामुळे सेवेबद्दल नागरिकांच्या रास्त अपेक्षा, मागण्या वाढल्या आहेत. यासाठी  शासनाच्या विविध योजना राबवितांना शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने, पारदर्शक कामकाज करणे आवश्यक आहे. यातून नागरी सेवा दिन साजरा केल्याचा आनंद मनात निर्माण होईल. जिल्ह्यात शासकीय यंत्रणाकडून विविध सेवांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. गावातील नागरिकांपर्यत जावून त्यांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र ठेवण्यासाठी त्यादृष्टिने विविध नागरी सेवांची निर्मिती करण्यात आली आहे. एकसंघतेतून राज्यासह देशाची आर्थिक, सामाजिक या सर्व आघाडीवर प्रगती चालू असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. 
प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी श्री. कांबळे म्हणाले की, शासकीय सेवेतील दैनंदिन कामकाज चांगले पार पडेल अशा विचार मनात ठेवून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण योगदानाने काम केले तर सर्वसामान्य माणसाला नक्कीच दिलासा मिळेल. जलयुक्त शिवार अभियान हे लोकसहभाग व शासकीय यंत्रणेमुळे परिणामकारक होत असून भविष्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी भरीव यश येण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  
यावेळी जल है तो कल है या विषयावरील व्याख्यानात अधीक्षक अभियंता श्री. अवस्थी म्हणाले की, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाला जलयुक्त शिवार हे अभियान राबवावे लागत आहे. याची नागरिकांनी जाणवी ठेवून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब न् थेंब डवून पाण्याचे संवर्धन, बचत करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी जास्त पाणी लागणाऱ्या पिकांचे क्षेत्र मर्यादीत ठेवून दुष्काळ परिस्थितीत पाण्याची बचत करता येईल. भविष्यात बेसुमार जलउपसा टाळावा लागेल, पावसाच्या पाण्याचे पूनर्भरण केले नाही तर नव्या पिढीलाही पाणी टंचाईला समोर जावे लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या कायदा विषयी सेवानिवृत्त नायब तहसिलदार श्री. राठोड म्हणाले की, जनतेच्या हितार्थ व इतर सार्वजनिक प्राधिकरणामध्ये पारदर्शकता व उत्तरदायीत्व आणण्यासाठी एक सर्वसमावेशक हा कायदा आहे. नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा पात्र व्यक्तीचा हक्क असून सेवा देण्याची विहित कालमर्यादा ठरवून दिलेली आहे. त्या मुदतीत सेवा पुरविली नाही तर त्याबाबत प्रथम अपील 30 दिवसात व दुसरे अपील 45 दिवसात करण्याची तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन नियत कालमर्यादेत लोकसेवा पुरविण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणाना याबाबत प्रोत्साहन व प्रेरणा देता येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी प्रास्ताविक केले तर तहसिलदार अरविंद नरसीकर यांनी सूत्रसंचालन केले. नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दुसऱ्या सत्रात नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे दाखविण्यात आले.   
0000000
जिल्ह्यात सोमवारी कंधार ऊर्ससाठी स्थानिक सुट्टी   
नांदेड,दि. 21 :- शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात असलेल्या नांदेड जिल्ह्यात सन 2016 साठी दोन स्थानिक सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सोमवार 25 एप्रिल 2016 रोजी हाजी सय्याह सरवरे मगदुम (रहे) ऊर्स कंधारसाठी स्थानिक सुट्टी राहील.
ही सुट्टी नांदेड जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये व शैक्षणिक संस्थांना लागू राहतील. हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू राहणार नाही. असेही या अधिसूचनेत म्हटले आहे. यापुर्वीची एक सुट्टी शुक्रवार 8 जानेवारी 2016 रोजी श्रीक्षेत्र माळेगाव खंडोबा यात्रेनिमित्त देण्यात आली होती.

0000000
आपत्ती परिस्थितीस संघटीतरित्या
प्रत्युत्तर देणे आवश्यक - कारभारी  
नांदेड दि. 21 :-  विविध आपत्‍ती एक दुस-यांशी संलग्‍न असल्‍याने एका पाठोपाठ  एक आपत्‍ती अचानकपणे उद्भवतात त्यामुळे आपत्ती परिस्थितीस संघटीतरित्‍या प्रत्‍युत्‍तर देणे आवश्‍यक असल्‍याचे मत निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी व्यक्त केले.  
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी  कार्यालयात काल संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व्ही. एल. कोळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय कंदेवाड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अधिकारी एस. एस. अवस्थी, मनपा उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, मनपा सहायक आयुक्त तथा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.‍ मिर्झा फरहातुल्ला बेग, मुख्य अग्निशमन अधिकारी शेख रईस पाशा हमिदोदिन यांची उपस्थिती होती.  
निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री. कारभारी  यांनी  जिल्ह्यात वारंवार उद्भवणा-या  विविध आपत्‍तींवर चर्चा करुन मानवनिर्मित, नैसर्गिक आपत्‍ती, तापमान वाढ तसेच आगामी दक्षिण-पश्चिम मान्‍सुनच्‍या अनुषंगाने आपत्‍ती व्‍यवस्‍थापन आराखडयात योग्‍य ती नोंद घेण्‍याची सूचना दिली. जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन आराखडा व आपत्ती व्‍यवस्‍थापन अधिनियमान्वये  निर्धारित  जबाबदारी  नुसार अधिकारी,  कर्मचाऱ्यांनी  वेळीच सतर्क राहून जिवीत किंवा वित्तहानी कमी करता येईल याची दक्षता घेण्‍याचे निर्देश दिले. भारतीय हवामान खात्‍याने चांगल्‍या पावसाचा अंदाज दर्शविला असून  नांदेड  जिल्‍हा हा पूर प्रवण असल्‍यामुळे नदी नाल्‍यांची  साफ-सफाई, पुलांच्‍या मुखाला साठलेला प्रतिरोधक कचरा याची सफाई त्‍वरीत करुन घेण्‍याचे निर्देश त्यांनी दिले.  
मनपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा सहायक आयुक्‍त डॉ. मिर्झा यांनी आगामी मान्‍सूनच्‍या पार्श्‍वभूमीवर नदीकाठच्‍या वाढलेल्‍या वस्‍त्या, जमिनीच्‍या  धुपमुळे वारंवार उद्भवणारी पुर परिस्थिती  व लोकांचे विस्‍थापन तसेच पूर प्रसंगी नागरीकांना सुरक्षित स्‍थळी ठेवण्‍याचे निवारे याबाबत नितीनिर्धारण करण्‍यात आली असून शहरातील मंगल कार्यालये, फंक्‍शन हॉल उपलब्‍ध करुन घेता येतील याबाबत माहिती दिली. 
जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. कंदेवाड  यांनी उष्‍णता लहरी व तापमान वाढ हे विषय जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन आराखडयात समाविष्ट करण्याबाबत सांगितले.  नांदेड शहराचे 44 डिग्री सेंटिग्रेड पर्यंत गेलेल्‍या तापमान वाढीवर उपाय योजनेची माहिती दिली. जिल्‍हयातील डॉक्‍टरांना प्रशिक्षित करण्‍यात आल्‍याचे व उष्‍माघाताचे प्राथमिक उपचार यावरही प्रशिक्षण देण्‍यात आल्‍याचे  सांगितले.  नागरीकांनी पांढरे रुमाल वापरावे, कारण नसताना उन्‍हात जाऊ नये, भरपुर पाणी प्यावे, याबाबत जनजागृती पत्रक तसेच नागरीकांना माहिती उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असल्‍याचे  सांगून  शासकीय रुग्‍णालयात कोल्‍ड वार्ड हे आपत्कालीन उपचार केंद्र उष्‍माघाताच्‍या रुग्‍णांसाठी 24 तास कार्यरत असल्‍याची माहिती त्यांनी दिली.
आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 च्या निर्देशानुसार स्‍थापन केलेल्‍या समिती अंतर्गत अधिकारी- कर्मचाऱ्यांना कायदान्वये  ठरवून  दिलेली कर्तव्ये, जवाबदा-या,  समितीमधील सहभागासंबंधी  जाणीव करुन देण्‍यासाठी  जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन आराखडा हा महत्‍वाचा दस्‍ताऐवज असल्‍याने त्‍यातील निर्देशांचे पालन करणे हे सर्वांचे कर्तव्‍य, जवाबदारी असल्‍याचे यावेळी स्‍पष्‍ट करण्‍यात आले. उपस्थित प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी  नांदेड जिल्‍हयाच्‍या आपत्‍ती  व्‍यवस्‍थापन आराखडयास पुर्णत: मान्‍यता प्रदान केली. बैठकीत आपत्‍ती  विषयक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

0000000

शनिवार, २ एप्रिल, २०१६

उष्णतेच्या लाटेबाबत आरोग्य विभागाचा इशारा
नांदेड, दि. 2 :-जिल्ह्यात आगामी आठवड्यात उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात तीव्र वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यासाठी उष्माघातापासून बचावाचे उपाय योजन्याचे आवाहन उष्माघात प्रतिबंधक कृती आराखडा समितीचे सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय कंदेवाड यांनी केले आहे.
नांदेडसह राज्यातील 6 जिल्ह्यांचा उष्माघात-प्रवण जिल्हे म्हणून उष्माघात प्रतिबंधक कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांसाठी उष्माघात प्रतिबंधक कृती आराखडा अंमलात आण्यात येत आहे. त्याअनुषंगाने तापमानातील बदल नोंदविण्यात येत आहे. नागपूर येथील विभागीय हवामान शास्त्र केंद्राने नोंदवलेल्या तापमानानुसार नांदेड जिल्ह्यात गेली तीन दिवस (31 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिल ) सातत्याने कमाल तापमान 42 सेल्सीअस अंश राहिले आहे. यापुढेही आगामी आठवड्यातील पाच दिवसांच्या तापमानाचा पारा तीव्र राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार 3 एप्रिल रोजी 43 सेल्सीअस अंश, 4 व 5 एप्रिल रोजी 44 सेल्सीअस अंश आणि 6 व 7 एप्रिल रोजी पुन्हा 43 सेल्सीअस अंश तापमान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार उष्माघात कृती आराखडा अन्वये जिल्ह्यात पुढील काळातील तीव्र तापमान बदलाबाबतचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार नागरिकांनी उष्माघातापासून बचावाच्या उपाय योजना कराव्यात. तीव्र तापमानामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणाम प्रतिबंध करण्यासाठी जेष्ठ नागरीक, लहान मुले, रुग्ण आदींची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

00000000
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष
जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकसेवा आयोगाच्या
परीक्षांसाठी पाच एप्रिलपासून मार्गदर्शन अभियान
दर मंगळवारी सायं. 5 वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात शिबीर

नांदेड, दि. 2 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त लोकसेवा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भविष्यातील संधीना गवसणी घालू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील होतकरू तरुणांसाठी विशेष मार्गदर्शन अभियान सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिली आहे. या संधीचा जिल्ह्यातील तरुणांनी पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. या दहा आठवड्याच्या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी  5 एप्रिल 2016 रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे होणार आहे. त्यापुढे दर मंगळवारी तज्ज्ञ मार्गदर्शकांची विषयनिहाय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समता व सामाजिक न्याय्य वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गतच पदवीचे शिक्षण घेत असलेले, पदवीधारक तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना राज्य लोकसेवा तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तसेच अन्यही महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी दर आठवड्याला एक अशा दहा मार्गदर्शन अभियानात शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे, महापालिका आयुक्त सुशील खोडवेकर, पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहीया यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे. अभियानात दर मंगळवारी  शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे सायंकाळी 5 ते 6.30 आणि सायंकाळी 6.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात विषय निहाय, तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये दि. 5,12,19,26 एप्रिल तसेच 3, 10, 7, 24, 31 मे आणि 7 जून 2016 या दर मंगळवारी मार्गदर्शन शिबीरे होतील. त्यामध्ये राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे स्वरुप, इतिहास, भुगोल, पर्यावरण, राज्यशास्त्र, पंचायतराज, विज्ञान, तंत्रविज्ञान, अर्थशास्त्र, कृषी, कायदे, शासनाच्या योजना, संगणक, माहिती व तंज्त्रज्ञान, गणित, सी-सॅट, तसेच मुलाखतीची तयारी अशा विषयावर मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
या दहा आठवड्यांच्या मार्गदर्शन अभियानात जिल्ह्यातील प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी सहायक जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड, रविंद्र बिनवडे, सहायक पोलीस अधीक्षक योगेशकुमार, उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले आदी मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, रमेश घोलप उपमुख्य कार्यकारी अधिकारी सतिश पाटील, तसेच लोकसेवा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रातील अविनाश धर्माधिकारी, आनंद पाटील, डॅा. किरण देसले, महेश शिंदे, तुषार घोरपडे आदींनाही मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मार्गदर्शन अभियानातील शिबीरासाठी उपस्थित राहणाऱ्या इच्छुकांनी सोबत वही-पेन आणावे व वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहनही संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. या मार्गदर्शन अभियानाचे उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे संयोजन करत आहेत. शिबीरास उपस्थित राहणाऱ्यांना परीक्षांविषयीची माहिती पुस्तिकाही वाटण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील होतकरू तरुणांसाठी संधी - जिल्हाधिकारी काकाणी
लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत जागरुकता वाढते आहे. योग्य वेळी मार्गदर्शन मिळाल्यास तरुणांसाठी मोठी संधी खुली होते. त्यासाठी स्पर्धा परीक्षांचे स्वरुप, विषय निहाय सखोल मार्गदर्शन, सराव अशारितीने तयारी करवून घेता यावी असे प्रयत्न आहेत, असे सांगताना जिल्हाधिकारी सुरेश काकाणी म्हणाले की, जिल्ह्यातील होतकरू तरुणांची मानसिकता तयार करणे आणि पुढे येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची संधी त्यांनी घ्यावी यासाठी हा उपक्रम आहे. त्यासाठी भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांची संधी समयोचित आहे. त्यामुळे या संधीचा जिल्ह्यातील विद्यार्थी-तरुणांनी पुरेपूर लाभ घ्यावा, अशी अपेक्षा आहे.

0000000