भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष
जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकसेवा आयोगाच्या
परीक्षांसाठी पाच एप्रिलपासून मार्गदर्शन अभियान
दर
मंगळवारी सायं. 5 वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात शिबीर
नांदेड, दि. 2 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त लोकसेवा स्पर्धा परीक्षांच्या
माध्यमातून भविष्यातील संधीना गवसणी घालू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील होतकरू
तरुणांसाठी विशेष मार्गदर्शन अभियान सुरु करण्यात येत असल्याची माहिती
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिली आहे. या संधीचा जिल्ह्यातील तरुणांनी
पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. या दहा आठवड्याच्या उपक्रमाचे
उद्घाटन मंगळवारी 5 एप्रिल 2016 रोजी
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे होणार आहे. त्यापुढे दर मंगळवारी तज्ज्ञ
मार्गदर्शकांची विषयनिहाय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त जिल्हास्तरावर
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समता व सामाजिक न्याय्य वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गतच
पदवीचे शिक्षण घेत असलेले, पदवीधारक तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना राज्य
लोकसेवा तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तसेच अन्यही महत्त्वपूर्ण स्पर्धा
परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी दर आठवड्याला एक अशा दहा मार्गदर्शन
अभियानात शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानासाठी
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे, महापालिका
आयुक्त सुशील खोडवेकर, पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहीया यांच्या मार्गदर्शनाखाली
नियोजन करण्यात येत आहे. अभियानात दर मंगळवारी
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे सायंकाळी 5 ते 6.30 आणि सायंकाळी 6.30 ते
रात्री 8 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात विषय निहाय, तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
त्यामध्ये दि. 5,12,19,26 एप्रिल तसेच 3, 10, 7, 24, 31 मे आणि 7 जून 2016 या दर
मंगळवारी मार्गदर्शन शिबीरे होतील. त्यामध्ये राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय
लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे स्वरुप, इतिहास, भुगोल, पर्यावरण, राज्यशास्त्र,
पंचायतराज, विज्ञान, तंत्रविज्ञान, अर्थशास्त्र, कृषी, कायदे, शासनाच्या योजना,
संगणक, माहिती व तंज्त्रज्ञान, गणित, सी-सॅट, तसेच मुलाखतीची तयारी अशा विषयावर
मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
या दहा आठवड्यांच्या
मार्गदर्शन अभियानात जिल्ह्यातील प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी सहायक जिल्हाधिकारी
डॅा. राजेंद्र भारूड, रविंद्र बिनवडे, सहायक पोलीस अधीक्षक योगेशकुमार,
उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले आदी मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय औरंगाबादचे विशेष
पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, रमेश घोलप
उपमुख्य कार्यकारी अधिकारी सतिश पाटील, तसेच लोकसेवा परीक्षा मार्गदर्शन
क्षेत्रातील अविनाश धर्माधिकारी, आनंद पाटील, डॅा. किरण देसले, महेश शिंदे, तुषार
घोरपडे आदींनाही मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
मार्गदर्शन अभियानातील शिबीरासाठी उपस्थित राहणाऱ्या इच्छुकांनी सोबत वही-पेन
आणावे व वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहनही संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. या
मार्गदर्शन अभियानाचे उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र
आऊलवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे संयोजन करत आहेत. शिबीरास उपस्थित
राहणाऱ्यांना परीक्षांविषयीची माहिती पुस्तिकाही वाटण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील होतकरू तरुणांसाठी संधी - जिल्हाधिकारी काकाणी
लोकसेवा आयोगाच्या
परीक्षांबाबत जागरुकता वाढते आहे. योग्य वेळी मार्गदर्शन मिळाल्यास तरुणांसाठी
मोठी संधी खुली होते. त्यासाठी स्पर्धा परीक्षांचे स्वरुप, विषय निहाय सखोल
मार्गदर्शन, सराव अशारितीने तयारी करवून घेता यावी असे प्रयत्न आहेत, असे सांगताना
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी म्हणाले की, जिल्ह्यातील होतकरू तरुणांची मानसिकता तयार
करणे आणि पुढे येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची संधी त्यांनी घ्यावी यासाठी हा उपक्रम
आहे. त्यासाठी भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी
वर्षांची संधी समयोचित आहे. त्यामुळे या संधीचा जिल्ह्यातील विद्यार्थी-तरुणांनी
पुरेपूर लाभ घ्यावा, अशी अपेक्षा आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा