जबाबदारीची
भावना, पारदर्शक कामकाजातून
प्रशासनाची
विश्वासार्हता वाढेल -
काकाणी
“ नागरी सेवा दिन ” साजरा
नांदेड दि. 21 :- जबाबदारीची
भावना, पारदर्शक कामकाजातून शिस्तबद्ध नियोजनपूर्ण प्रयत्नातून कामात सातत्य ठेवले
तर नागरिकांमध्ये प्रशासनाची विश्वासर्हता वाढिला लागेल, असा विश्वास जिल्हाधिकारी
सुरेश काकाणी यांनी आज येथे व्यक्त केला.
जिल्हा
प्रशासनाच्यावतीने आयोजित डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन
येथे “नागरी सेवा दिन” कार्यक्रमात
मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी बोलत होते. यावेळी प्रभारी
अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी व्ही. एल. कोळी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन ) श्री. कोकणे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता
एस. एस. अवस्थी, सेवानिवृत्त नायब तहसिलदार पी. के. राठोड
आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
श्री. काकाणी पुढे म्हणाले की, नागरिकांसाठी राज्य शासनाने “माहितीचा अधिकार कायदा”, “सेवा
हमी विधेयक कायदा” आणला आहे. त्यामुळे सेवेबद्दल नागरिकांच्या रास्त अपेक्षा,
मागण्या वाढल्या आहेत. यासाठी शासनाच्या
विविध योजना राबवितांना शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने, पारदर्शक कामकाज करणे
आवश्यक आहे. यातून “नागरी सेवा दिन” साजरा केल्याचा आनंद मनात निर्माण होईल. जिल्ह्यात शासकीय यंत्रणाकडून विविध
सेवांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. गावातील नागरिकांपर्यत जावून त्यांचे
प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र ठेवण्यासाठी त्यादृष्टिने विविध
नागरी सेवांची निर्मिती करण्यात आली आहे. एकसंघतेतून
राज्यासह देशाची आर्थिक, सामाजिक या सर्व आघाडीवर प्रगती
चालू असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रभारी
अप्पर जिल्हाधिकारी श्री. कांबळे म्हणाले की, शासकीय सेवेतील दैनंदिन कामकाज
चांगले पार पडेल अशा विचार मनात ठेवून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण योगदानाने काम
केले तर सर्वसामान्य माणसाला नक्कीच दिलासा मिळेल. “जलयुक्त
शिवार अभियान” हे लोकसहभाग व शासकीय यंत्रणेमुळे परिणामकारक होत असून भविष्यात
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी भरीव यश येण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला.
यावेळी “जल है तो कल है” या विषयावरील व्याख्यानात
अधीक्षक अभियंता श्री. अवस्थी म्हणाले की, पाणी टंचाईवर मात
करण्यासाठी राज्य शासनाला “जलयुक्त
शिवार” हे अभियान राबवावे लागत आहे. याची नागरिकांनी जाणवी ठेवून
येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब न् थेंब अडवून
पाण्याचे संवर्धन, बचत करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी जास्त पाणी लागणाऱ्या पिकांचे
क्षेत्र मर्यादीत ठेवून दुष्काळ परिस्थितीत पाण्याची बचत करता येईल. भविष्यात बेसुमार
जलउपसा टाळावा लागेल, पावसाच्या पाण्याचे पूनर्भरण
केले नाही तर नव्या पिढीलाही पाणी टंचाईला समोर जावे लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
“महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015” या
कायदा विषयी सेवानिवृत्त नायब तहसिलदार श्री. राठोड म्हणाले की, जनतेच्या हितार्थ
व इतर सार्वजनिक प्राधिकरणामध्ये पारदर्शकता व उत्तरदायीत्व आणण्यासाठी एक
सर्वसमावेशक हा कायदा आहे. नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा पात्र
व्यक्तीचा हक्क असून सेवा देण्याची विहित कालमर्यादा ठरवून दिलेली आहे. त्या
मुदतीत सेवा पुरविली नाही तर त्याबाबत प्रथम अपील 30 दिवसात व दुसरे अपील 45
दिवसात करण्याची तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली. माहिती तंत्रज्ञानाचा वापर
करुन नियत कालमर्यादेत लोकसेवा पुरविण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणाना याबाबत
प्रोत्साहन व प्रेरणा देता येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
निवासी
उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी प्रास्ताविक केले तर तहसिलदार अरविंद नरसीकर
यांनी सूत्रसंचालन केले. नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास
विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दुसऱ्या
सत्रात नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट
प्रक्षेपण डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे दाखविण्यात आले.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा