आपत्ती
परिस्थितीस संघटीतरित्या
प्रत्युत्तर
देणे आवश्यक - कारभारी
नांदेड दि. 21 :- विविध आपत्ती एक
दुस-यांशी संलग्न असल्याने एका पाठोपाठ
एक आपत्ती अचानकपणे उद्भवतात त्यामुळे आपत्ती परिस्थितीस संघटीतरित्या
प्रत्युत्तर देणे आवश्यक असल्याचे मत निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी
यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी
सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात काल संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत
होते. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) तथा
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व्ही. एल. कोळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय
कंदेवाड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अधिकारी एस. एस. अवस्थी, मनपा उपायुक्त डॉ.
विजयकुमार मुंढे, मनपा सहायक आयुक्त तथा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.
मिर्झा फरहातुल्ला बेग, मुख्य अग्निशमन अधिकारी शेख रईस पाशा हमिदोदिन यांची
उपस्थिती होती.
निवासी
उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी जिल्ह्यात वारंवार उद्भवणा-या विविध आपत्तींवर चर्चा करुन मानवनिर्मित,
नैसर्गिक आपत्ती, तापमान वाढ तसेच आगामी दक्षिण-पश्चिम मान्सुनच्या अनुषंगाने
आपत्ती व्यवस्थापन आराखडयात योग्य ती नोंद घेण्याची सूचना दिली. जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन आराखडा व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये निर्धारित
जबाबदारी नुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळीच सतर्क राहून जिवीत किंवा वित्तहानी कमी करता
येईल याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. भारतीय हवामान खात्याने चांगल्या पावसाचा
अंदाज दर्शविला असून नांदेड जिल्हा हा पूर प्रवण असल्यामुळे नदी नाल्यांची साफ-सफाई, पुलांच्या मुखाला साठलेला प्रतिरोधक
कचरा याची सफाई त्वरीत करुन घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मनपा प्रादेशिक
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा सहायक आयुक्त डॉ. मिर्झा यांनी आगामी मान्सूनच्या
पार्श्वभूमीवर नदीकाठच्या वाढलेल्या वस्त्या, जमिनीच्या धुपमुळे वारंवार उद्भवणारी पुर परिस्थिती व लोकांचे विस्थापन तसेच पूर प्रसंगी
नागरीकांना सुरक्षित स्थळी ठेवण्याचे निवारे याबाबत नितीनिर्धारण करण्यात आली
असून शहरातील मंगल कार्यालये, फंक्शन हॉल उपलब्ध करुन घेता येतील याबाबत माहिती
दिली.
जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. कंदेवाड यांनी उष्णता
लहरी व तापमान वाढ हे विषय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडयात समाविष्ट करण्याबाबत
सांगितले. नांदेड शहराचे 44 डिग्री सेंटिग्रेड
पर्यंत गेलेल्या तापमान वाढीवर उपाय योजनेची माहिती दिली. जिल्हयातील डॉक्टरांना
प्रशिक्षित करण्यात आल्याचे व उष्माघाताचे प्राथमिक उपचार यावरही प्रशिक्षण
देण्यात आल्याचे सांगितले. नागरीकांनी पांढरे रुमाल वापरावे, कारण नसताना
उन्हात जाऊ नये, भरपुर पाणी प्यावे, याबाबत जनजागृती पत्रक तसेच नागरीकांना माहिती
उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगून शासकीय रुग्णालयात कोल्ड वार्ड हे आपत्कालीन
उपचार केंद्र उष्माघाताच्या रुग्णांसाठी 24 तास कार्यरत असल्याची माहिती त्यांनी
दिली.
आपत्ती
व्यवस्थापन कायदा 2005 च्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या समिती अंतर्गत
अधिकारी- कर्मचाऱ्यांना कायदान्वये ठरवून दिलेली कर्तव्ये, जवाबदा-या, समितीमधील सहभागासंबंधी जाणीव करुन देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा हा महत्वाचा
दस्ताऐवज असल्याने त्यातील निर्देशांचे पालन करणे हे सर्वांचे कर्तव्य, जवाबदारी
असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. उपस्थित प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्हयाच्या आपत्ती व्यवस्थापन आराखडयास पुर्णत: मान्यता प्रदान
केली. बैठकीत आपत्ती विषयक विविध
विषयांवर चर्चा करण्यात आली.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा