शनिवार, २ एप्रिल, २०१६

उष्णतेच्या लाटेबाबत आरोग्य विभागाचा इशारा
नांदेड, दि. 2 :-जिल्ह्यात आगामी आठवड्यात उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात तीव्र वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यासाठी उष्माघातापासून बचावाचे उपाय योजन्याचे आवाहन उष्माघात प्रतिबंधक कृती आराखडा समितीचे सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय कंदेवाड यांनी केले आहे.
नांदेडसह राज्यातील 6 जिल्ह्यांचा उष्माघात-प्रवण जिल्हे म्हणून उष्माघात प्रतिबंधक कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांसाठी उष्माघात प्रतिबंधक कृती आराखडा अंमलात आण्यात येत आहे. त्याअनुषंगाने तापमानातील बदल नोंदविण्यात येत आहे. नागपूर येथील विभागीय हवामान शास्त्र केंद्राने नोंदवलेल्या तापमानानुसार नांदेड जिल्ह्यात गेली तीन दिवस (31 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिल ) सातत्याने कमाल तापमान 42 सेल्सीअस अंश राहिले आहे. यापुढेही आगामी आठवड्यातील पाच दिवसांच्या तापमानाचा पारा तीव्र राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार 3 एप्रिल रोजी 43 सेल्सीअस अंश, 4 व 5 एप्रिल रोजी 44 सेल्सीअस अंश आणि 6 व 7 एप्रिल रोजी पुन्हा 43 सेल्सीअस अंश तापमान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार उष्माघात कृती आराखडा अन्वये जिल्ह्यात पुढील काळातील तीव्र तापमान बदलाबाबतचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार नागरिकांनी उष्माघातापासून बचावाच्या उपाय योजना कराव्यात. तीव्र तापमानामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणाम प्रतिबंध करण्यासाठी जेष्ठ नागरीक, लहान मुले, रुग्ण आदींची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: