शुक्रवार, २२ एप्रिल, २०१६

पर्यावरण बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी
 वृक्ष लागवड अत्यावश्यक - काकाणी
जिल्ह्यात सात लाख 91 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट

नांदेड दि. 22 :- तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी, दुष्काळ या पर्यावरणीय बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी शासनाच्या विविध कार्यालयांनी लोकसहभागातून येत्या पावसाळ्यात 1 जुलै रोजी वन महोत्सव कालावधीत वृक्ष लागवडीचे नियोजन करावे व  त्यांच्या संगोपनासाठीही काटेकोर दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज केले.    
शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहभागातून जिल्ह्यात येत्या पावसाळ्यात 1 ते 7 जुलै 2016 या कालावधीतवनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 1 जुलै रोजी या एकाच दिवशी सात लाख 91 हजार वृक्ष रोप लागवडीचे उद्दीष्ट हाती घेण्यात आले असून याविषयी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.  
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, सहायक जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक तथा समितीचे सदस्य सचिव सुर्यकांत मंकावार, जिल्हा वनसंरक्षक सुजय डोडल यांच्यासह संबंधीत विभागाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.  
जिल्हाधिकारी श्री. काकाणी पुढे म्हणाले की , वन महोत्सव कालावधीत वृक्षलागवड करताना नियमांचे बंधन लक्षात घेऊन विविध विभागांनी वृक्षाची लागवड करावी. त्यासाठी संबंधीत विभागाचे मार्गदर्शन घ्यावे. जलयुक्त शिवार अभियानाइतकेच  वृक्षाची लागवड करणे महत्वाचे झाले आहे. भविष्यातील वातावरण निरोगी राहून नागरिकांचे आरोग्य चांगले, समाधानी राहण्यास वृक्ष लागवडीची मोठी मदत होणार आहे. जिल्ह्यातील विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रुग्णालये, ग्रामपंचायती,  कारखाने, न्यायालये, शेतीबांध, स्मशानभुमी आदी ठिकाणी  जागेचे नियोजन करुन मोठ्या प्रमाणात रोपे लावता येतील. शासकीय जागेवरील रोपांची  व्यवस्था, संगोपन, पालकत्व संबंधीत कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या ठिकाणी वृक्ष लागवड करता येतील तेथे त्याठिकाणी प्रयत्न करावेत. जिल्ह्याला दिलेले वृक्षलागवडीचे उद्दीष्ट लक्षात घेऊन त्यापेक्षाही जास्त वृक्ष लावली तर पर्यावरण संरक्षणासाठी  फायदाचे  राहील. लोकसहभागातून  मोठ्या प्रमाणात चांगली कामे होतात. त्याद्वारे जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्याचे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी जिल्ह्यात 1 जुलै रोजी एकाच दिवशी दिलेल्या रोप लागवडीच्या उद्दीष्टाची माहिती संबंधित विभागांना दिली. त्यात वन विभाग 4 लाख 80 हजार, सामाजिक वनीकरण 15 हजार, वनविकास महामंडळ किनवट 10 हजार असे 5 लाख 5 हजार तर या व्यतिरिक्त जिल्ह्यातील विविध विभागांना 2 लाख 86 हजार अशी जिल्ह्यात एकूण 7 लाख 91 हजार रोपे लागवड करण्याबाबतचे हे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.   
 वन महोत्सवाची पार्श्वभुमी स्पष्ट करताना सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक तथा सदस्य सचिव श्री. मंकावार म्हणाले की, मनुष्य वृक्षाशिवाय जगू शकत नाही. वातावरणातील बदलामुळे  विविध देशात वृक्षाची लागवड करण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांना, संस्था, मंडळे, आदींनी महसूल व वन विभागाचा 31 मार्च 2016 रोजीच्या शासन निर्णयान्वये वन महोत्सव कालावधीत 1 जुलै रोजी वृक्षाची लागवड करुन प्रभावी सहभाग नोंदवावा, असे  आवाहनही त्यांनी यावेळी केले. बैठकीत सामाजिक वनीकरण विभागाच्या सहायक संचालक श्रीमती पारधी यांनी वन महोत्सव  विषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.   

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: