शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड, दि.12 - शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, दीनदुबळ्या-दलित, मागास जनतेसाठी सदैव संघर्षशील राहीलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याचे काम राज्य शासन करील असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या 'गोपीनाथ गड' या स्मारकाचे लोकार्पण आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा होते. तर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, राज्य मंत्रीमंडळातील मंत्री एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, दिवाकर रावते, गिरीष महाजन, विष्णू सावरा, गिरीष बापट, प्रकाश मेहता, राम शिंदे, बबनराव लोणीकर, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाऊसाहेब फुंडकर, सरोज पांडे, खा.रामदास आठवले, खा.राजू शेट्टी, खा.चंद्रकांत खैरे, आ.विनायक मेटे, महादेव जानकर, श्रीमती प्रज्ञा मुंडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासातून मिळालेल्या अनुभवामुळेच आपण राज्याचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, मुंडे साहेबांच्या अचानक जाण्यामुळे आम्हाला मोठा आघात झाला, मात्र त्यांची कन्या पंकजाताईंनी या समाजाचे नेतृत्व पुढेचालविल्यामुळे या समाजातील प्रश्नांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गडाच्या निर्मिती मध्ये राज्य शासनाचा एकही पैसा नसून तो केवळ गोपीनाथरावांच्या प्रियजणांनी आपल्या घामाच्या पैशातून उभा केला आहे. हा गड आपल्या सर्वांना दीनदुबळ्या समाजाच्या विकासासाठी सतत प्रेरण देत राहील.
स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेवून राज्य शासन त्यांच्या स्मृती सतत तेवत ठेवणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी सतत जागरूक राहून संघर्ष करणाऱ्या मुंडे साहेबांच्या नावाने शेतकरी अपघात विमा योजना राज्यात राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला असून, 1 कोटी 37 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाख रूपयांचा विमा काढण्यात येत आहे. सातत्याने ऊसतोड कामगारांसाठी लढा देणाऱ्या व त्यांच्यासाठी परिश्रम घेणाऱ्या मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळ निर्माण केले असून,कामगारांच्या मुलांना प्रशिक्षण तसेच कामगारांना सामाजिक सुरक्षा व पेन्शन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. याशिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पुढाकाराने औरंगाबाद येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेसाठी शासन आवश्यक ती मदत करणार असल्याचेही ते म्हणाले.
गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम केले. त्याचप्रमाणे राज्य सरकार राज्यातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करेल आणि दाऊदची वाकडी नजर राज्यावर पडू देणार नाही असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे साहेबांच्या प्रेरणेने पाच वर्षात राज्य सरकार शेतकऱ्यांचे जीवनमान सुखकर करण्याचा प्रयत्न करीत राहील असा विश्वास व्यक्त केला.
समारंभाचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या भाषणात तळागाळातील जनतेसाठी गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील शेतकऱ्यांच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून चांगले कार्य करीत असल्याचे सांगून त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या विविध योजनांची माहिती सांगितली.
राज्य शासन चांगले काम करीत असून नजीकच्या काळात महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर राहील  असा विश्वास व्यक्त करून अमित शहा यांनी गोपीनाथगड पुढील काळात गरीबांच्या सेवेसाठी सरकारला सतत प्रेरणा देत राहील अशी भावना व्यक्त केली.
राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालविकास आणि रोजगार हमी तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बोलतांना गडाची संकल्पना स्पष्ट केली. हा गड गोपीनाथ मुंडे यांच्यावर अमर्याद प्रेम करणाऱ्या जनमानसाने उभारला असून, हे गोरगरीब, कष्टकरी जनतेच्या प्रेमाचे प्रतिक आहे असे सांगत वंचितांच्या विकासाचे मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा गड नेहमी प्रयत्नशिल राहणार असल्याचे स्पष्ट केले.
मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत पंकजा पुढे म्हणाल्या की, त्यांची आठवण सदैव आपल्या मनात राहील, त्यांच्या संकल्पना, स्वप्न आणि कार्य पूर्ण करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहणार आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा गड आहे. दीनदुबळ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या पुढेही सुरू राहील. या गडामध्ये अनेक सामाजिक उपक्रम साकारले जाणार असून, ऊसतोड कामगार, दीनदुबळ्या वंचित समाजाच्या विकासाची सामाजिक जडणघडण या गोपीनाथ गडाच्या माध्यमातून भविष्यात करण्याचा मानसही पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रारंभी खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी प्रास्ताविकात गोपीनाथ गडाच्या उभारणीमागील भूमिका स्पष्ट केली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खा.रामदास आठवले आणि भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी आपले विचार मांडले. यावेळी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या मुलांना व अकोला येथील किडनी रॅकेटमधील पीडितांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. तसेच गोपीनाथगडाच्या उभारणीमधील रचनाकार सतिश साबडे यांचा सत्कार करण्यात आला.
या समारंभास राज्यभरातून लाखोंच्या संख्येने नागरीक उपस्थित होते. शेवटी फुलचंद कराड यांनी सर्वांचे आभार मानले.


सामाजिक स्वास्थ्य वृद्धींगत होण्यासाठी खटल्यांमध्ये सामंजस्याने तडजोड आवश्यक - न्या. बारणे राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन संपन्न

नांदेड, दि. 12 :- सामाजिक स्वास्थ्य वृद्धींगत व्हावे यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीच्या उपक्रमाद्वारे जास्तीत जास् प्रकरणांत सामंजस्याने तोडगा काढण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता टी. बारणे यांनी आज येथे केले. नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीच्या  उद्घाटन प्रसंगी  न्यायाधीश बारणे बोलत होत्या. जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन् झाला.
यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 ए. एल. यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, नांदेड जिल्‍हा अभिवक्‍ता संघाचे अध्‍यक्ष अॅड विजयकुमार भोपी, जिल्हा सरकारी वकील अॅड. बालाजी शिंदे, जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. आर. कुरेशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. जिल्हा न्यायाधीश जी. ओ. अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश श्रीमती मंजुषा देशपांडे, मुख्‍य न्‍याय दंडाधिकारी ए. बी. भस्‍मे, जिल्हा न्यायाधीश जी. बी. गुरव, पी. जी. पाटील, तसेच निवृत्‍त जिल्‍हा न्‍यायाधीश ए.आर.ए.जी. कुरेशी, श्रीमती कमल वडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना न्या. बारणे पुढे म्हणाल्या की, राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून प्रलंबित आणि समेट करता येण्यासारखी प्रकरणे निकालात काढण्याची मोठी संधी आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्वच विधीज्ज्ञ, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस दल तसेच विविध कार्यालये यांनी सहकार्याने पुढाकार घेतला आहे. यामध्ये भुसंपादनासारख्या संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकरणांचाही विचार केला जाणार आहे. अशी प्रकरणे मोठ्या प्रमाणात तडजोडीने निकाली काढली जाण्याने सामाजिक स्वास्थ्य वृद्धींगत करण्यास हातभार लागतो. याशिवाय न्यायालयांकडे प्रलंबित प्रकरणे मोठ्या प्रमाणात निकाली निघाल्याने, न्यायालयीन कामकाजाचाही ताण कमी होतो. लोकन्यायालयात  प्रकरण  तडजोडीने निकाली निघाल्यास, पुन्हा त्यावर पुढे अपिल करता येत नाही. यामुळे आजच्या दगदगीच्या जीवनात मध्यस्थीने तडजोडीने वाद संपुष्टात आणण्यालाही महत्त्व आहे. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्याने, न्यायालयीन  व्यवस्थेलाही ज्या प्रकरणात खरोखरच गरज आहे, अशा प्रकरणात लक्ष केंद्रीत करता येते. समेटामुळे  पक्षकारांच्या  चेहऱ्यावर येणारा आनंदही, न्यायालयीन यंत्रणेसाठी समाधान देणारी बाब ठरते, असेही त्या म्हणाल्या.
अप्पर पोलीस अधीक्षक श्री. डोईफोडे यांनीही पक्षकार आणि विधीज्ज्ञ आदी घटकांनी लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने संपृष्टात आणावीत असे आवाहन केले.
सुरुवातीला प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती बारणे व इतर मान्यवरांच्या हस्ते न्यायदेवतेस  पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय लोकन्‍यायालयाची संकल्‍पना व आयोजनाबद्दल सविस्तर माहिती देऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. आर. कुरेशी यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड विजय गोणारकर यांनी केले तर अॅड प्रविण आयचित यांनी आभार मानले. कार्यक्रमास पक्षकार, विधिज्‍ज्ञ, न्‍यायिक अधिकारी, विविध सार्वजनिक उपक्रम, बँका, विमा कंपनी, तसेच शासकीय विभाग यांचे अधिकारी, कर्मचारी, न्‍यायालयाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.     
राष्ट्रीय लोकन्‍यायालयात जिल्‍ह्यात 12 हजारांहून अधिक प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी दाखल करुन घेण्‍यात आली आहेत. या लोकन्‍यायालयासाठी विविध पॅनल्स तयार करण्यात आल असून या पॅनल्समध्ये जेष्ठ न्यायिक अधिकारी, विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व अधिकारी यांचा समावेश आहे,

00000000

शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

जिल्ह्यातील 106 बोगस डॉक्टरांची यादी जाहीर बोगस डॉक्टरांकडून उपचार घेऊ नयेत प्रशासनाचे आवाहन

नांदेड, दि. 11 :- जिल्ह्यातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांना आळा बसावा यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यात 106 अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक आसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून सादर करण्यात आली. त्यावर जिल्ह्यातील जनतेने व रुग्णांनी अशा अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांकडून (बोगस डॉक्टर) उपचार घेऊ नयेत, असे आवाहन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दिले. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील या अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांची यादी प्रसिध्दीस दिली आहे.
या प्रसिध्दीपत्रकात असेही नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यात बोगस वैद्यकीय अधिकारी आढळून आल्यास ते रुग्‍णावर उपचार करत असतील तर संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय  अधिक्षक, आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
हे अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिक तालुका निहाय पुढीलप्रमाणे नांदेड तालुका : मो. अब्दुल  वसिर छोटे साब- मन्यारगल्ली नांदेड. अकबर शेख- मुर्गी बाजार नांदेड. अभिमन्यु व्यंकटराव मुगल- धनेगाव. बालाजी दौलतराव पवार- काकांडी. विलास भोंग- तुप्पा. चंदाराणी अशोक भिसे व अर्चना स्वामी कासराळीकर- विष्णुपूरी. बि. एस. नागरे व गजानन शेषेराव शिंदे- कासारखेडा. अर्धापूर : पांचाळ नारायण-दाभड, पवार नाना- कोंढा;  बिलोली : सय्यद महेमद स. पठाण- डोणगाव बु. शिवकांत तिवारी-बेळकोणी बु. सुब्रम्हण्यम- दुगाव. तुकाराम सूर्यवंशी-आदमपूर. संगम विभूते- अजणी. शिवाजी पाटील व श्रीनिवास अकुलवार- फिरस्ती. धोंडीबा रायसकर- बेळकोणी खु. बालाजी हामंद- माचनूर. संभाजी भुरे- आदमपूर. धर्माबाद : नारायण गौड-नायगाव. बी. सी. सरकार- करखेली. नायगाव- सुर्यवंशी रमेश- नर्सी. राई मोहन- कोलंबी. संजिद सरकार- टेंम्बुर्णी. पि. विश्वास- आंतरगाव. प्रल्हाद विश्वास- रुई बु.      देगलूर : महम्मद अब्दुल गफार खान- मरखेल, बाबा नवाज व शेख चांदसाब- सांगवी उ. हणमंत निमलवार- सुगाव. नागनाथ लोणे- मांडगी. नागनाथ पाटील- शेळगाव. शेख बहोदिन मेहताब- शेळगाव. चंद्रकांत जाधव- सुगाव. गौतम कांबळे- शिळवणी. सुभाष बारोळे- वझर. माधव जाधव- भु. हिप्परगा. कोंडाबाई गायकवाड- वझर. याहया हुसेन सौदागर- हनेगाव. बालगोंडा जुक्कलकर व जगतालकर- मानुर. लालू वाघमारे- मरतोळी. कोळगिरे- हानेगाव. मुखेड : भरत मंडल्‍ तेलंगु- मोटरगा. सुनिल विश्वास- पाळा. गोपाळ कदम- पाळा. उत्पल मंडल- चोंडी. व्यंकटी कुलकर्णी-सावळी. मंडल पि. के.- एकलारा. हदगाव : आनंदास कन्ह्यालालदास- नेवारी. हिमायतनगर : लक्ष्मण पिन्नलवाड- मंगरुळ. सावंत डी. जी.- सरसम. पिन्नरवाड जी. एन – सवना. राऊत सिध्दार्थ-जिरोना. खिल्लारे आर. एल.- खडकी. डुलाजी भिसीकर- धानोरा. चंद्रभान कोरडे- मंगरुळ. उप्पलवाड जी. एन.- चिंचोर्डी. बालाजीराव, रणधीर मंडल- हिमायतनगर.    भोकर : शिगोजीकर जी. आर.- किनी. वीर मठ- निर्मल. गौतम बोईन- बगाल. जाधव एस. जी- रेणापूर. टोगरवार- शिवनगर तांडा. सुमन मितू-चिदगीरी, हिमाद्री रॉय-जांभळी. उमरी : संदीप रॉय- सिंधी. शब्दरा एस. के. – शेलगाव. राठोड गोविंद-बोळसा बा. संतोष विश्वास- तळेगाव. डांगे आर. एस.- बोथी. पांचाळ किशन- गोळेगाव. गिरी महाराज- नागठाणा. तोगरवाड बी. डी. व सावजी सुर्यवंशी- बितनाळ. सोळंखे एस. आर.- इळेगाव. संतोष- तुराटी. गिरी- रावधानोरा. बंगाली राहूल- शिरुर तांडा. श्रीविश्वास-मोखंडी. शिवकुमार गुरुदास- बोथी. प्रदीप मंडळ- कारला. किनवट : दादाराव चव्हाण-दहेलीतांडा. बाबु के. विश्वास- दहेली गाव. कोवर सिंग राठोड व अशोक राठोड- कोठारी तांडा. प्रवीण मुंडे- मांडवी. गजानन बाडगुरे व राठोड विलास- जवरला. अलीम बिसवास–रायपूर. नागेश झिंगरवाड- चिकली. बाऊराव राठोड- मारलागुंडा. श्रीनिवास कुंटलवाड, साईनाथ हिरेकर- अंदबोरी. शिवर सुर्यंवशी, सोयन्ना यरपुरवार, सरेंद्र यरपूरवार- सर्व मलकजांब. सुरेश कोंड, सागर कडताप, लिंगारेडी कट्टा, सुधाकर कट्टा-सर्व अप्पारावपेठ. 

0000000

रविवार, ६ डिसेंबर, २०१५

जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे मंगळवारी विद्यापीठात व्याख्यान

नांदेड, दि. 6  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलातर्फे आयोजित कार्यशाळेसाठी जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर मंगळवार 8 व बुधवार 9 डिसेंबर 2015 रोजी नांदेड येथे येत आहेत. त्यानिमित्ताने नांदेड येथील विद्यार्थी, पालक व विज्ञान प्रेमी नागरीकांसाठी भौतिकशास्त्र संकुलातर्फे डॉ. जयंत नारळीकर यांचे मंगळवार 8 डिसेंबर 2015 रोजी सायंकाळी 5.30 वाजता विद्यापीठ परीसरात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय विश्वात आपण एकटेच आहोत का ? हा असून हे व्याख्यान मराठीतून असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या व्याख्यानासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरु डॉ. जनार्धन वाघमारे, पंडीत रवीशंकर शुक्ल विद्यापीठ, रायपूर येथील कुलगुरु डॉ. एस. के. पांडे व इतरही सहा ते सात नामांकीत शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. व्याख्यान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती समोर आयोजित करण्यात आले असून या व्याख्यानाचा लाभ इच्छुकांना घेता यावा म्हणून शहरातून बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. व्याख्यानाचा  विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक, विज्ञानप्रेमी नागरीक आदींनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरु डॉ. पंडीत विद्यासागर, कुलसचिव बी. बी. पाटील, भौतिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. आर. एस. खैरनार, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एम. के. पाटील, डॉ. एस. सी. कुंभारखाने, डॉ. एम. पी. महाबोले, डॉ. आर. एस. माने, डॉ. ए. व्ही. सरोदे, डॉ. के. ए. बोगले आदींनी केले आहे.

0000000

जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, केळीसाठी फळपीक विमा योजना लागू विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 10 डिसेंबर

नांदेड, दि. 6 - राज्यात प्रायोगीकतत्वावर राबविण्यात येणाऱ्या हवामान आधारीत पथदर्शक फळपीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात सन 2015-16 साठी द्राक्ष, मोसंबी (आंबिया बहार) व केळी या पिकांसाठी विमा योजना शासनाने लागू केली आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व त्यासाठी बँकेत विमा हप्ता भरावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. योजनेसाठी बँकेत विमा हप्ता भरण्याची अंतिम मूदत गुरुवार 10 डिसेंबर असल्याचेही त्यांनी कळवले आहे. 
पाऊस, तापमान, सापेक्ष आद्रता, वेगाचे वारे व गारपीट यापासून फळपीक विमा योजनेच्या तरतुदी प्रमाणे फळपिकांना निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे, असे योजनेचे उद्दीष्ट आहे. यामध्ये समाविष्ट अधिसुचित फळपिके, तालुके व महसूल मंडळे पुढील प्रमाणे आहेत. फळपीक मोसंबी :- नांदेड- लिंबगाव व विष्णुपुरी. मुदखेड- बारड. केळी :- नांदेड- तरोडा बु, तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी. अर्धापुर- अर्धापुर, दाभड, मालेगाव. मुदखेड- मुदखेड, मुगट, बारड. हदगाव- हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी. लोहा-शेवडी बा. भोकर- भोकर. देगलुर-मरखेल, हानेगाव. द्राक्ष:- नांदेड - तरोड बु, तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी. अर्धापूर-अर्धापूर, दाभड, मालेगाव. मुदखेड-मुदखेड, बारड, मुगट. हदगाव- हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी.  लोहा- शेवडी बा. भोकर- भोकर. देगलूर-मरखेल, हानेगाव.
जिल्हयातील अधिसुचीत क्षेत्रावरील अधिसुचीत फळपिकांसाठी विमा संरक्षण देय राहील. द्राक्ष, मोसंबी व केळी घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. अधिसुचीत फळपिकांसाठी पिक कर्ज मर्यादा विविध वित्त संस्थाकडे मंजुर आहे अशा सर्व कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची राहील. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक राहील.
अधिसुचीत फळपिकांसाठी समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी पुढील प्रमाणे.  द्राक्ष-  अवेळी पाऊस  ( 1 डिसेंबर 2015 ते 31 मार्च 2016 ). मोसंबी (आंबिया बहार) - अवेळी  पाऊस  ( 1 डिसेंबर 2015 ते 31 डिसेंबर 2015 ), जास्त तापमान   ( 1 मार्च 2016 ते 31 मार्च 2016 ), जास्त पाऊस  ( 15 ऑगस्ट 2016 ते 15 सप्टेंबर 2016 ). केळी- कमी तापमान ( 1 डिसेंबर 2015 ते 29 फेब्रुवारी 2016 ), वेगाचा वारा ( 1 मार्च 2016 ते  31 जुलै 2016 ),  जास्त तापमान ( 1 मार्च 2016 ते 31 मे 2016 ).
फळपीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000000

बुधवार, २ डिसेंबर, २०१५

आधारभूत खरेदीसाठी कापूस पेऱ्याची सातबारा उताऱ्यावर नोंद आवश्यक

नांदेड दि. 2 - आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कापसाच्या लागवडीच्या प्रमाणातच कापूस खरेदी करावयाचा असल्याने कापूस खरेदी वेळेस संबंधीत शेतकऱ्यांचे सातबारा उतारे अद्ययावत असावेत यासाठी सातबारांवर कापूस पेऱ्याची नोंद करण्याबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांनी संबंधीत यंत्रणांना सूचित केले आहे.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत कापूस पणन महासंघातर्फे लवकर कापसाची खरेदी सुरु करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कापसाच्या लागवडीच्या प्रमाणातच कापूस खरेदी करण्यात येणार असून ज्यादा कापूस खरेदी केला जाणार नाही, त्यासाठी खरेदीच्यावेळी शेतकऱ्यांच्या सातबारावरील कापूस पेऱ्यानुसारच कापूस स्विकारण्यात येईल. कापूस विक्रीस आणतेवेळी शेतकऱ्यांच्या सातबारावरील उताऱ्यामध्ये कापूस पेऱ्याच्या नोंदी अद्ययावत नसतात त्यासाठी या नोंदी वेळीच अद्ययावत करण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी सर्व तहसिलदार व संबंधीत यंत्रणांना दिले आहेत.
कापूस खरेदी नंतरच्या देय रक्कमा शेतकऱ्यांना आरटीजीईएस, एनईएफटी पद्धतीने करण्यात येणार आहेत. त्यासाठी कापूस विक्रीस येतांना शेतकऱ्यांनी त्यांचे राष्ट्रीयकृत किंवा अन्य बँकांच्या खात्याची संपूर्ण माहिती (खाते क्रमांक, आयएफएससी कोड, आधार कार्डाची प्रत, मोबाईल क्रमांक इत्यादी ) देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे कापसाच्या चुकाऱ्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात विना विलंब जमा करणे शक्य होते. त्यासाठी संबंधीत यंत्रणांनी शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणताना सातबाराचे कापूस पेऱ्याच्या अद्ययावत नोंदी असलेले उतारे व बँक खात्यासंदर्भातील माहिती न चुकता आणावी. यासाठीही सर्व यंत्रणांनी शेतकऱ्यांना माहिती दयावी, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रात विविध यंत्रणांना, आदींना सूचित करण्यात आले आहे.

000000000

कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर औजारे

नांदेड दि. 2 - शेतकऱ्यांना स्वत:च्या मालकी हक्काचे कृषि यंत्रसामुग्री, औजारे खरेदी करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषि यांत्रिकीरण उपअभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येत असून त्यासाठी शेतकरी, ग्रामीण उद्योजक, शेतकऱ्यांचे गट, कृषि विज्ञान केंद्र यांनी प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षकृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या उपअभियानांतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार मागणीप्रमाणे शासनाने निवड केलेल्या उत्पादकांची उत्पादने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या औजारांचे दर शासनाने निश्चित केले आहेत. या उपअभियानांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पावर टिलर, रिपर, नांगर, कल्टीवेटर, रोटावेटर, रिझर, पेरणी यंत्र, पाचटकुट्टी यंत्र, कडबाकुट्टी यंत्र इत्यादी औजारे अनुदानावर घेता येतील. ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती, जमाती, अल्प, अत्यल्प भुधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना किंमतीच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त 1 लाख ते 1 लाख 25 हजार इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 75 हजार ते 1 लाख अनुदान देय आहे. कृषि औजारासाठी अनुसूचित जाती , जमाती, अल्प, अत्यल्प भुधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना किंमतीच्या 50 टक्के इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या 40 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त अनुदानाचे दर औजार निहाय वेगवेगळे आहेत. ज्या शेतकऱ्यांना औजारे, ट्रॅक्टर हवी आहेत त्यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सातबारा, आठ जातीच्या दाखल्यासह अर्ज करावा. लक्षांकाच्या मर्यादेत प्रथम प्राप्त प्रथम प्राधान्य” या तत्वावर शेतकऱ्याची निवड आर्थिक लक्ष समोर ठेवून केली जाणार आहे. जिल्हा स्तरीय निवड समितीने मंजूर केलेल्या यादीतील शेतकऱ्यांना निवड केलेल्या औजारांची पूर्ण किंमत महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ नांदेड यांच्याकडे भरल्यानंतरच औजाराचा पुरवठा होणार आहे नंतर अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या बँक खाती जमा केली जाणार आहे.
भाडेतत्वावर कृषि यांत्रिकीरण सेवेसाठी कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठीही अनुदान दिले जाणार आहे. यासाठी एकूण 10 लाखाचे औजारे घ्यावे लागतील त्यासाठी 4 लाखाचे अनुदान दिले जाणार आहे. प्रगतशील शेतकरी, ग्रामीण उद्योजक, शेतकऱ्यांचे गट, कृषि विज्ञान केंद्र यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे जिल्हा अधिक्षकृषि अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
000000000