शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

सामाजिक स्वास्थ्य वृद्धींगत होण्यासाठी खटल्यांमध्ये सामंजस्याने तडजोड आवश्यक - न्या. बारणे राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन संपन्न

नांदेड, दि. 12 :- सामाजिक स्वास्थ्य वृद्धींगत व्हावे यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीच्या उपक्रमाद्वारे जास्तीत जास् प्रकरणांत सामंजस्याने तोडगा काढण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता टी. बारणे यांनी आज येथे केले. नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीच्या  उद्घाटन प्रसंगी  न्यायाधीश बारणे बोलत होत्या. जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन् झाला.
यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 ए. एल. यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, नांदेड जिल्‍हा अभिवक्‍ता संघाचे अध्‍यक्ष अॅड विजयकुमार भोपी, जिल्हा सरकारी वकील अॅड. बालाजी शिंदे, जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. आर. कुरेशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. जिल्हा न्यायाधीश जी. ओ. अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश श्रीमती मंजुषा देशपांडे, मुख्‍य न्‍याय दंडाधिकारी ए. बी. भस्‍मे, जिल्हा न्यायाधीश जी. बी. गुरव, पी. जी. पाटील, तसेच निवृत्‍त जिल्‍हा न्‍यायाधीश ए.आर.ए.जी. कुरेशी, श्रीमती कमल वडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना न्या. बारणे पुढे म्हणाल्या की, राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून प्रलंबित आणि समेट करता येण्यासारखी प्रकरणे निकालात काढण्याची मोठी संधी आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्वच विधीज्ज्ञ, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस दल तसेच विविध कार्यालये यांनी सहकार्याने पुढाकार घेतला आहे. यामध्ये भुसंपादनासारख्या संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकरणांचाही विचार केला जाणार आहे. अशी प्रकरणे मोठ्या प्रमाणात तडजोडीने निकाली काढली जाण्याने सामाजिक स्वास्थ्य वृद्धींगत करण्यास हातभार लागतो. याशिवाय न्यायालयांकडे प्रलंबित प्रकरणे मोठ्या प्रमाणात निकाली निघाल्याने, न्यायालयीन कामकाजाचाही ताण कमी होतो. लोकन्यायालयात  प्रकरण  तडजोडीने निकाली निघाल्यास, पुन्हा त्यावर पुढे अपिल करता येत नाही. यामुळे आजच्या दगदगीच्या जीवनात मध्यस्थीने तडजोडीने वाद संपुष्टात आणण्यालाही महत्त्व आहे. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्याने, न्यायालयीन  व्यवस्थेलाही ज्या प्रकरणात खरोखरच गरज आहे, अशा प्रकरणात लक्ष केंद्रीत करता येते. समेटामुळे  पक्षकारांच्या  चेहऱ्यावर येणारा आनंदही, न्यायालयीन यंत्रणेसाठी समाधान देणारी बाब ठरते, असेही त्या म्हणाल्या.
अप्पर पोलीस अधीक्षक श्री. डोईफोडे यांनीही पक्षकार आणि विधीज्ज्ञ आदी घटकांनी लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने संपृष्टात आणावीत असे आवाहन केले.
सुरुवातीला प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती बारणे व इतर मान्यवरांच्या हस्ते न्यायदेवतेस  पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय लोकन्‍यायालयाची संकल्‍पना व आयोजनाबद्दल सविस्तर माहिती देऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. आर. कुरेशी यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड विजय गोणारकर यांनी केले तर अॅड प्रविण आयचित यांनी आभार मानले. कार्यक्रमास पक्षकार, विधिज्‍ज्ञ, न्‍यायिक अधिकारी, विविध सार्वजनिक उपक्रम, बँका, विमा कंपनी, तसेच शासकीय विभाग यांचे अधिकारी, कर्मचारी, न्‍यायालयाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.     
राष्ट्रीय लोकन्‍यायालयात जिल्‍ह्यात 12 हजारांहून अधिक प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी दाखल करुन घेण्‍यात आली आहेत. या लोकन्‍यायालयासाठी विविध पॅनल्स तयार करण्यात आल असून या पॅनल्समध्ये जेष्ठ न्यायिक अधिकारी, विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व अधिकारी यांचा समावेश आहे,

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: