नांदेड दि. 18 :- केकी मुस पुरस्काराला दुसऱ्यांदा
गवसणी घालण्यातून विजय होकर्णे यांनी आपल्यातील कलावंतील संवेदना जागृत ठेवल्याचे
प्रत्यंतर येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी येथे केले.
राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारातील राज्यस्तरीय
उत्कृष्ट छायाचित्रकार केकी मुस पुरस्कार दुसऱ्यांदा पटकावणाऱ्या छायाचित्रकार
विजय होकर्णे यांचा गुरुवार 17 डिसेंबर रोजी सपत्नीक ह्दय अभिनंदन सोहळा कुसूम
सभागृह येथे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात
श्री. भालेराव प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
नांदेडच्या महापौर सौ. शैलजा किशोर स्वामी होत्या. महाराष्ट्र वीरशैव सभा, स्वयंवर
प्रतिष्ठान, अभंग पुस्तकालय, नांदेड क्लब, मॅार्निग वॅाक ग्रुप, मराठवाडा
फोटोग्राफर असोसिएशन व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिनंदन
सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी
व्यासपीठावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक
राधाकृष्ण मुळी, नांदेड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती अनुजा तहेरा, किशोर
स्वामी, सौ. राजश्री हेमंत पाटील, माजी महापौर प्रा. सुनील नेरळकर, ज्येष्ठ
पत्रकार संजीव कुळकर्णी, महाराष्ट्र वीरशैव सभेचे नांदेडचे अध्यक्ष राजेंद्र
हुरणे, मराठवाडा फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष गुणवंत पाटील-हंगरगेकर, उद्योजक
सतिश सामते, उमाकांत जोशी, योगेश जयस्वाल, ओमप्रकाश वर्मा, अविनाश मारकोळे-पाटील,
आर. एम. सुर्वे तसेच सौ. अरूणा होकर्णे यांची उपस्थिती होती.
पुढे
बोलताना श्री. भालेराव म्हणाले की, केकी मुस यांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार
त्या छायाचित्रकाराच्या वाटचालीतील छायाचित्रणामधील जबाबदारी, दिशादर्शन अधोरेखीत
करतो. छायाचित्र हे बातमीहून प्रभावी असते. एक काळ असा होता, की कृष्णधवल
छायाचित्र छापण्याशिवाय पर्याय नव्हता. पण त्यातही प्रतिभावंत छायाचित्रकार आपल्या
मेहनतीने छायाचित्रात जिवंतपणा आणत असत. अशाचरितीने श्री. होकर्णे यांनी गेली तीस
वर्षांहून अधिक काळ बातम्यांसाठी छायाचित्र आणि छायाचित्रांतून बातम्या टिपण्याचे
काम केले आहे. त्यांचे कित्येक वर्षांचे हे कॅमेऱ्यामागचे काम, केकी मुस यांच्या
नावाने पुरस्कार मिळण्याने कॅमेऱ्यापुढेही आले आहे. केकी मुस हे विलक्षण प्रतिभेचे
कलांवत होते. चाळीस गावातील त्यांच्या घरातून अडतीस वर्षे बाहेर न पडताही, त्यांनी
टेबल-टॅाप हे छायाचित्रणातील सिद्धांत जगभर पोहचवला, सिद्ध केला. त्यांच्या नावाने
दिला जाणारा हा पुरस्कार मिळणेही श्री. होकर्णे यांच्यातील प्रतिभेला दाद आहे.
विविध कलावंतांनी होकर्णे यांच्या छायाचित्रण कलेला, त्यातील धडपड आणि तत्परतेला
दिलेली दादही एका कलावंताने दुसऱ्या कलावंतासाठीचे संचित आहे. या संचिताच्या
जोरावर श्री. होकर्णे यापुढील वाटचाल करतील. नांदेडच्या बदलांबाबतचे त्यांची
छायाचित्रकारिता आश्वासक आहे. त्यामधून एक उत्कृष्ट छायाचित्र दालनही उभं करता,
येईल, असेही श्री. भालेराव म्हणाले.
जिल्हाधिकारी
श्री. काकाणी म्हणाले की,
तंत्रज्ज्ञानातील परिवर्तन आत्मसात करून छायाचित्रण क्षेत्रातील विजय
होकर्णे यांची वाटचाल वैशिष्ट्यपुर्ण आहे. कृष्ण-धवल ते मोबाईल-स्मार्टफोनच्या
काळातील छायाचित्रण असे अनेक बदल या क्षेत्रात झाले आहेत. पण तरीही संशोधकवृत्तीने
आणि एकाग्र आणि कलावंताच्या अस्वस्थतेतून प्रत्येक गोष्ट नेमकी असावी असा नेमकेपणा
श्री. होकर्णे यांच्याकडे दिसतो. त्यामुळेच त्यांच्याकडून छायाचित्रण
क्षेत्रासाठीचे आश्वासक असे काम झाले आहे.
संचालक
श्री. मुळी आपल्या भाषणात म्हणाले की, प्रसंगाला चिरजींवीत्त्व प्राप्त करून
देण्यात छायाचित्रकाराचे योगदान असते. अतिवृष्टीच्या काळात टिपलेल्या
छायाचित्रांतील भावनांनाही श्री. होकर्णे यांच्यामुळे अमरत्त्व प्राप्त झाले आहे.
शासकीय सेवेत असतानाही, आपल्यातील सर्जनशीलतेला मर्यादा पडू न देता, त्यापलिकडची
छायाचित्रकारिता श्री. होकर्णे यांनी जोपासली आहे. त्यांचा माणसे जोडण्याचा
स्वभावही तितकाच विलक्षण आहे. नांदेडच्या निरंतर विकास प्रक्रियेतील बदल होकर्णे
यांनी टिपले आहेत. हे खूप महत्त्वपूर्ण काम आहे.
अध्यक्षीय
समारोप करताना महापौर सौ. स्वामी म्हणाल्या की, कलाकार अपार कष्ट घेणारा असेल, तर
काय करू शकतो, याचे विजय होकर्णे उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी प्रचलित वाटेवर
चालतानाच, आपल्या छायाचित्र कला क्षेत्रात साम्राज्य उभे केले आहे. त्यांचा सर्वच
क्षेत्रात लिलया वावर असतो. नांदेडच्या सांस्कृतिक विकासाचे ते साक्षीदार आहेत.
त्यासह अनेक क्षेत्रातील बदल टिपून विजय होकर्णे यांनी नांदेडच्या दृष्टीने खूप
मोठे काम केले आहे.
सत्काराला
उत्तर देताना विजय होकर्णे यांनी आपला जीवनपटच उलगडला. छायाचित्रण क्षेत्रातील
प्रवेश ते राजकीय, सांस्कृतिक आणि कला-साहित्य क्षेत्रानेही आपल्या छायाचित्र
कलेला दाद दिली. या छायाचित्रण कलेमुळेच या क्षेत्रात मुशाफिरी करता आले.
त्याक्षेत्रासाठी काही करता आले, त्यापोटी या क्षेत्रांनीही मला खूप काही दिले.
यापुढेही छायाचित्रणाच्या माध्यमातून अशीच सेवा करणार असल्याचे भावोद्गागारही
त्यांनी काढले.
कार्यक्रमात
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले, तसेच कॅमेऱ्याचे पूजन आणि केकी
मुस यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले. माजी महापौर प्रा. सुनिल नेरळकर यांनी
प्रास्ताविक केले. विजय होकर्णे यांच्या छायाचित्रण क्षेत्रातील प्रवासाबाबतची
वैशिष्ट्यपुर्ण “विजय होकर्ण- द टॉप अँगल” ही ध्वनीचित्रफीतही प्रदर्शित करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री.
काकाणी यांच्या हस्ते मानपत्र, मानचिन्ह, पुष्पहार, शाल-श्रीफळ या स्वरुपात विजय
होकर्णे यांचा तसेच महापौर सौ. स्वामी यांच्या हस्ते सौ. अरूणा होकर्णे यांचा
सत्कार करण्यात आला. उमाकांत जोशी यांनी मानपत्राचे वाचन केले. याप्रसंगी
शिवछत्रपती पुरस्कार विजते बंकट यादव यांचाही व्यासपीठावर सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावरील मान्यवरांनाही विजय होकर्णे यांनी कॅमेराबद्ध केलेल्या विविध
छायाचित्रांच्या तसबिरीही भेट देण्यात आल्या. प्रा. देविदास फुलारी यांनी
सुत्रसंचालन केले, तर भारत होकर्णे यांनी आभार मानले. कार्यक्रमास नांदेडच्या
कला-साहित्य, राजकीय, सामाजिक तसेच छायाचित्रण आणि उद्योग-व्यापार क्षेत्रातील
अनेक मान्यवर, कलारसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा