बुधवार, २ डिसेंबर, २०१५

आधारभूत खरेदीसाठी कापूस पेऱ्याची सातबारा उताऱ्यावर नोंद आवश्यक

नांदेड दि. 2 - आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कापसाच्या लागवडीच्या प्रमाणातच कापूस खरेदी करावयाचा असल्याने कापूस खरेदी वेळेस संबंधीत शेतकऱ्यांचे सातबारा उतारे अद्ययावत असावेत यासाठी सातबारांवर कापूस पेऱ्याची नोंद करण्याबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांनी संबंधीत यंत्रणांना सूचित केले आहे.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत कापूस पणन महासंघातर्फे लवकर कापसाची खरेदी सुरु करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कापसाच्या लागवडीच्या प्रमाणातच कापूस खरेदी करण्यात येणार असून ज्यादा कापूस खरेदी केला जाणार नाही, त्यासाठी खरेदीच्यावेळी शेतकऱ्यांच्या सातबारावरील कापूस पेऱ्यानुसारच कापूस स्विकारण्यात येईल. कापूस विक्रीस आणतेवेळी शेतकऱ्यांच्या सातबारावरील उताऱ्यामध्ये कापूस पेऱ्याच्या नोंदी अद्ययावत नसतात त्यासाठी या नोंदी वेळीच अद्ययावत करण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी सर्व तहसिलदार व संबंधीत यंत्रणांना दिले आहेत.
कापूस खरेदी नंतरच्या देय रक्कमा शेतकऱ्यांना आरटीजीईएस, एनईएफटी पद्धतीने करण्यात येणार आहेत. त्यासाठी कापूस विक्रीस येतांना शेतकऱ्यांनी त्यांचे राष्ट्रीयकृत किंवा अन्य बँकांच्या खात्याची संपूर्ण माहिती (खाते क्रमांक, आयएफएससी कोड, आधार कार्डाची प्रत, मोबाईल क्रमांक इत्यादी ) देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे कापसाच्या चुकाऱ्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात विना विलंब जमा करणे शक्य होते. त्यासाठी संबंधीत यंत्रणांनी शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणताना सातबाराचे कापूस पेऱ्याच्या अद्ययावत नोंदी असलेले उतारे व बँक खात्यासंदर्भातील माहिती न चुकता आणावी. यासाठीही सर्व यंत्रणांनी शेतकऱ्यांना माहिती दयावी, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रात विविध यंत्रणांना, आदींना सूचित करण्यात आले आहे.

000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: