बीड, दि.12 - शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, दीनदुबळ्या-दलित,
मागास जनतेसाठी सदैव संघर्षशील राहीलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वप्नातील
महाराष्ट्र घडविण्याचे काम राज्य शासन करील असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केले.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ
सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात
आलेल्या 'गोपीनाथ गड' या स्मारकाचे लोकार्पण आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती
पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा होते. तर विधानसभा अध्यक्ष
हरीभाऊ बागडे, राज्य मंत्रीमंडळातील मंत्री एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत
पाटील, विनोद तावडे, दिवाकर रावते, गिरीष महाजन, विष्णू सावरा, गिरीष बापट, प्रकाश
मेहता, राम शिंदे, बबनराव लोणीकर, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष
रावसाहेब दानवे, भाऊसाहेब फुंडकर, सरोज पांडे, खा.रामदास आठवले, खा.राजू शेट्टी, खा.चंद्रकांत
खैरे, आ.विनायक मेटे, महादेव जानकर, श्रीमती प्रज्ञा मुंडे आदी मान्यवरांची प्रमुख
उपस्थिती होती.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासातून मिळालेल्या अनुभवामुळेच
आपण राज्याचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस
पुढे म्हणाले की, मुंडे साहेबांच्या अचानक जाण्यामुळे आम्हाला मोठा आघात झाला, मात्र
त्यांची कन्या पंकजाताईंनी या समाजाचे नेतृत्व पुढेचालविल्यामुळे या समाजातील प्रश्नांना
न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गडाच्या निर्मिती मध्ये राज्य शासनाचा एकही
पैसा नसून तो केवळ गोपीनाथरावांच्या प्रियजणांनी आपल्या घामाच्या पैशातून उभा केला
आहे. हा गड आपल्या सर्वांना दीनदुबळ्या समाजाच्या विकासासाठी सतत प्रेरण देत राहील.
स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेवून राज्य
शासन त्यांच्या स्मृती सतत तेवत ठेवणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या
प्रश्नांविषयी सतत जागरूक राहून संघर्ष करणाऱ्या मुंडे साहेबांच्या नावाने शेतकरी अपघात
विमा योजना राज्यात राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला असून, 1 कोटी 37 लाख शेतकऱ्यांना
प्रत्येकी 2 लाख रूपयांचा विमा काढण्यात येत आहे. सातत्याने ऊसतोड कामगारांसाठी लढा
देणाऱ्या व त्यांच्यासाठी परिश्रम घेणाऱ्या मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगार
महामंडळ निर्माण केले असून,कामगारांच्या मुलांना प्रशिक्षण तसेच कामगारांना सामाजिक
सुरक्षा व पेन्शन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी
सांगितले. याशिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पुढाकाराने औरंगाबाद
येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेसाठी शासन आवश्यक ती मदत करणार
असल्याचेही ते म्हणाले.
गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात अंडरवर्ल्डच्या
गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम केले. त्याचप्रमाणे राज्य सरकार राज्यातील गुन्हेगारांचा
बंदोबस्त करेल आणि दाऊदची वाकडी नजर राज्यावर पडू देणार नाही असे सांगून मुख्यमंत्री
फडणवीस यांनी मुंडे साहेबांच्या प्रेरणेने पाच वर्षात राज्य सरकार शेतकऱ्यांचे जीवनमान
सुखकर करण्याचा प्रयत्न करीत राहील असा विश्वास व्यक्त केला.
समारंभाचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा यांनी आपल्या भाषणात तळागाळातील जनतेसाठी गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या कार्याचा
गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वाखाली केंद्रातील सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील
सरकार गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील शेतकऱ्यांच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून चांगले
कार्य करीत असल्याचे सांगून त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या
विविध योजनांची माहिती सांगितली.
राज्य शासन चांगले काम करीत असून नजीकच्या काळात महाराष्ट्र
राज्य देशात पहिल्या क्रमांकावर राहील असा
विश्वास व्यक्त करून अमित शहा यांनी गोपीनाथगड पुढील काळात गरीबांच्या सेवेसाठी सरकारला
सतत प्रेरणा देत राहील अशी भावना व्यक्त केली.
राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालविकास आणि रोजगार
हमी तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बोलतांना गडाची संकल्पना स्पष्ट
केली. हा गड गोपीनाथ मुंडे यांच्यावर अमर्याद प्रेम करणाऱ्या जनमानसाने उभारला असून,
हे गोरगरीब, कष्टकरी जनतेच्या प्रेमाचे प्रतिक आहे असे सांगत वंचितांच्या विकासाचे
मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा गड नेहमी प्रयत्नशिल राहणार असल्याचे स्पष्ट
केले.
मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत पंकजा पुढे म्हणाल्या की,
त्यांची आठवण सदैव आपल्या मनात राहील, त्यांच्या संकल्पना, स्वप्न आणि कार्य पूर्ण
करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहणार आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा गड
आहे. दीनदुबळ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या पुढेही सुरू राहील.
या गडामध्ये अनेक सामाजिक उपक्रम साकारले जाणार असून, ऊसतोड कामगार, दीनदुबळ्या वंचित
समाजाच्या विकासाची सामाजिक जडणघडण या गोपीनाथ गडाच्या माध्यमातून भविष्यात करण्याचा
मानसही पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रारंभी खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी प्रास्ताविकात गोपीनाथ
गडाच्या उभारणीमागील भूमिका स्पष्ट केली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खा.रामदास
आठवले आणि भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी आपले विचार मांडले. यावेळी गोपीनाथ
मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या मुलांना व अकोला येथील किडनी रॅकेटमधील
पीडितांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. तसेच गोपीनाथगडाच्या उभारणीमधील
रचनाकार सतिश साबडे यांचा सत्कार करण्यात आला.
या समारंभास राज्यभरातून लाखोंच्या
संख्येने नागरीक उपस्थित होते. शेवटी फुलचंद कराड यांनी सर्वांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा