आधुनिक जीवनशैलीमुळे होणारा आजार , हा कोणता नवीन आजार
आहे ? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होणं साहजिकच आहे. हा काही नवीन आजार नसून जुन्याच
आजारामध्ये पूर्वीपेक्षा झालेली प्रचंड वाढ. थोडक्यात रुग्णांची टक्केवारी वाढणे आणि
एखादा आजार पूर्वी चाळीस-पन्नाशीनंतर होत असल्यास तो अगदी तरुण पिढीस सुद्धा होणे,
“आमची तर जीवनशैली साधीच आहे” असा समज आम्हाला असे आजार होणार
नाहीत असा गैरसमजही तुमचा होण्याची शक्यता आहे. कारण ह्या आजारांचा संबंध अगदी सहज
उपलब्ध होणाऱ्या व नियमित वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूशी आहे. उदा. टीव्ही,
कॉम्प्युटर, मोबाईल फोन, आरमदायी गाड्या इत्यादी वस्तू नाहीत असं घर शोधून सापडणार
नाही. किंवा कॉम्प्युटर, मोबाईल न वापरणारे ऑफिस, शासकीय-निमशासकीय ऑफीस सापडणार नाही.
मग या अनुषंगाने निर्माण झालेले आजार घरोघरी असणार यात काही शंका नाही. आधुनिक जीवनशैलीस
पर्याय नाही, पण दक्षताही बाळगावीच लागणार. आधुनिक जीवनशैलीबाबत पुण्याच किंवा मुंबईच
उदाहरण घ्या. देशी-विदेशी कंपन्यांमध्ये नजिकच्या काळात प्रचंड वाढ झालेली आहे. सर्वत्र
संगणक आणि मोबाईल वापरण्यास पर्याय राहिलेला नाही. सरकारी कार्यालयापासून शाळा-कॉलेजही
यास अपवाद राहिलेली नाहीत. या लेखात आपण पाहुया असेच काही आजार, त्याची लक्षणे व कारणे.
पाठदुखी : त्याची लक्षणे पुढील प्रमाणे- पाठीत वेदना होणे,
पाठ आखडणे. हालचाल करताना वेदना होणे. पायात कळा येणे, मुंग्या येणे, बधीरपणा येणे,
ताकदीवर परिणाम होणे, पायातील ताकद कमी होणे. कारणे- मणक्यातील झिज, चकती झिजणे. मणक्यातील
चकती सरकते. मस्क्युलर स्प्रेन (स्नायुंची इजा), पाठीस मार लागणे, झटका बसणे. हाडांचा
ठिसुळपणा, मणक्याचा संधिवात व इतर कारणे.
मानदुखी : मानेत कळा येणे, मानेची हालचाल करताना वेदना
होणे, कधी-कधी चक्कर आल्यासारखे वाटणे, मान आखडून जाणे. हातात कळा येणे, मुंग्या येणे,
बधीरपणा येणे, हातातील ताकद कमी होणे. कारणे
: मणक्यातील झिज, चकती झिजणे. मणक्यातील चकती सरकणे. मस्क्युलर स्प्रेन (स्नायुंची
इजा), मानेस मार लागणे, झटका बसणे, हाडांचा ठिसूळपणा, संधीवात व इतर कारणे.
खांदेदुखी : लक्षणे- खांद्यात वेदना होणे. खांद्याच्या
हालचाली करताना वेदना होतात. उदा. केस विंचरण्यास त्रास होतो. हात पाठीमागे घेण्यास
त्रास होतो किंवा घेता येत नाही. खांद्यातून दंडातसुद्धा कळ मारते. कारणे – फ्रोझन
शोल्डर- सांध्यात जाळी होणे. बासेपीटल टेंडीनायटीस- दंडाच्या बायसेफ स्नायूच्या टेंडनची
झिज होणे. रोटेटर कफ स्प्रेन- खांदा फिरवणऱ्या स्नायुंना इजा होणे.
कोपरदुखी: लक्षणे – कोपराच्या बाहेरील किंवा आतील भागात
कळा मारणे. हात कोपरातून सरळ करताना अथवा दमुडताना कळ मारणे. कपडे पिळताना किंवा स्क्रू
ड्रायव्हरची हालचाल करताना कोपरात कळ मारणे. कारणे- टेनिस एल्बो कोपराच्या बाहेरील भागास चिकटलेले स्नायू
फाटल्यामुळे किंवा झिजल्यामुळे हा त्रास होतो. गोल्फर्स एल्बो – कोपराच्या आतील भागास
चिकटलेले स्नायू फाटल्यामुळे किंवा झिजल्यामुळे हा त्रास होतो.
मनगट, पंजा व बोटे दुखणे : 1) कार्पल अनल सिंड्रोम- लक्षणे-
या आजारात मनगटातून पंजात नंतर अंगठ्याच्या बाजूच्या साडेतील बोटात ( अंगठा, त्याबाजुचे
बोट, मधले बोट व त्याच्या बाजुचे अर्धेबोट) कळा येतात, मुंग्या येतात, बधीरपणा येतो,
भडका उडाल्यासारखे वाटते, पिना टोचल्यासारखे वाटते, पंजाच्या उंचवट्याची व साडेतीन
बोटातील ताकदसुद्धा कमी होते. कारणे – मनगटातून
पंजाच्या उंचवट्यात व नंतर अंगठ्याच्या बाजुच्या साडेतीन बोटांना संवेदना पुरवणाऱ्या
मेडीयन नर्व्हवर दाव येणे किंवा ती शिर दबली जाणे.
डि-करव्हान्स : लक्षणे – अंगठ्याच्या बाजुच्या मनगटाच्या
भागात कळ मारणे. मनगटाची हालचाल करताना उदा. टायपिंग करताना, कपडे पिळताना, झाडू मारताना
मनगटात, अंगठ्यात व त्याबाजुच्या बोटात वेदना होतात. कारणे – अंगठा व त्याबाजुचे बोट
तळ हाताच्या विरुद्ध दिशेस उचलण्यास मदत करणाऱ्या स्नायुंच्या आवरणास “सूज” आल्यामुळे होणारा त्रास.
ट्रीगर फिंगर व ट्रीगर थंब : लक्षणे – अंगठा किंवा बोट मुडपून पुन्हा सरळ करत
असताना वेदना होणे किंवा अंगठा किंवा बोट मुडपलेल्या अवस्थेत आडकते व खटका (बंदुकीच्या
खटक्यासारखे) मारुन सरळ होते. कारणे- अंगठा व बोटाकडे जाणाऱ्या शिरेच्या आवरणात सूज
येते. आवरणाच्या दाबामुळे शिरेस सूज येते. गाठीसारखी सूज आल्यामुळे अंगठ्याची व बोटाची
हालचाल करताना बोट अडकल्यासारखे वाटते.
गुडघेदुखी : लक्षणे – खाली बसून उठत असताना हात टेकून उठावे
लागणे. ऊठ-बस करताना गुडघ्यात कळा मारणे. गुडघ्यावर सूज येणे. जिने चढ-उतार करताना
वेदना होणे. कारणे- गुडघ्यातील सांध्याचे आवरण झिजणे. वाटीचे आतील आवरण झिजणे. हाडांचा
ठिसूळपणा. व्यायाम न केल्यामुळे, सुर्यप्रकाशात न गेल्यामुळे स्नयायुंमध्ये आलेला अशक्तपणा.
गुडघ्यास मार लागल्यामुळे कुरचा व स्नायुंना झालेली इजा.
टाचदुखी : लक्षणे- बराच वेळ बसून उठल्यानंतर टाचेत वेदना
होणे. काही वेळ पंजावर भार दिल्यानंतर थोड्यावेळाने टाचेतील वेदना कमी होतात. सकाळी
झोपून उठल्यानंतरही टाच दुखते. थोडावेळ पंजावर चालल्या नंतर वेदना कमी होते. कारणे-
टाचेच्या खाली असलेले नैसर्गिक कुशन (फेशिया ) झिजणे - कुशन झिजल्यामुळे टाचेच्या हाडावर
भार येणे. (वजन वाढल्यामुळे होणारा भास). टाचेच हाड वाढणे, टाचेच्या हाडात पोकळी निर्माण
होणे. टाचेला चिकटलेल्या टेंडोॲचीलीसची झिज होणे किंवा टेंडोॲचीलीस व टाचेच्या हाडा
दरम्यान असणाऱ्या पाण्याच्या पिशवीस सूज येणे.
हाडांचा ठिसूळपणा : लक्षणे- वारंवार अंग दुखणे, जिने चढ-उतार
करताना गुडघ्यात, मांडीत पोटरीत कळा येणे, चालताना थकवा जाणवणे, पोटरीत कळा मारणे,
बाह्य अंगात बदल होणे, पाठ दुखणे, मान दुखणे. कारणे- हाडांची घनता कमी होते (कॅल्शियम
कमी होते), हाडे फळ्यावर लिहिण्यास वापरल्या जाणाऱ्या खडूसारखी होणे. व्यायाम न करणे,
सूर्यप्रकाशात न जाणे, डायबेटीस, थारॉईडचे आजार, अयोग्य आहार.
अंगदुखी व अतिरिक्त युरिक ॲसिड : लक्षणे – अंगदुखी, अंग
जड वाटणे, वारंवार सांधे दुखणे, सांध्यावर सूज येणे. कारणे – 1) Type I – प्रायमरी
गाऊट- अनुवंशिक असतो. Uric Acid निर्मिती किंवा विघटन करणारी यंत्रणा नैसर्गिकरीत्या
खराब झालेली असते. 2) Type II सेकंडरी गाऊट आधुनिक जीवनशैली, अती प्रोटिनयुक्त आहार,
व्यायाम न करता खाणे, पाणी कमी पिणे इत्यादी.
प्रतिबंधात्मक उपाय – कारणे आणि परिणाम या दोन वेगवेगळ्या
बाबी आहेत. एखादा आजाराबाबत कारणावर इलाज केल्यास परिणात आपोआप निघून जातो. आधुनिक
जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारामध्ये जीवशास्त्रीय रिदम बिघडणे ( म्हणजे चुकीच्या वेळी
जेवणे, चुकीच्या वेळी झोपणे, व्यायाम न करणे, नियमित सूर्यप्रकाशात न जाणे, न चालणे
इत्यादी ) हे मूळ कारण आहे.
प्रतिबंधात्मक इलाजावर कडक अंमल केल्यास सर्व
काही शक्य होईल : योग्य वेळी योग्य आहार घ्या – आहाराबाबत एक फार उपयोगी म्हण आहे.
“औषधासारखे जेवण घ्या… नाहीतर जेवणाएवढे
औषध खावे लागेल” रोजच्या आहाराचे किमान तीन भाग
करा.
रॉयल ब्रेकफास्ट- ज्याला आपण मराठीत न्याहारी म्हणतो. खूप
वेळ उपाशी राहाणाऱ्या व्यक्तीस डायबिटीस (अनुवंशिक नसलेला) होण्याची शक्यता असते. मिडल क्लास लंच
– मध्यमवर्गीय दुपारचे जेवण. 3) बेगर्स डिनर – एकदम कमी – सॅलेड किंवा हिरव्या पाले
भाज्यायुक्त संध्याकाळचे जेवण घ्यावे. संध्याकाळचे जेवण आणि झोप या दरम्यान किमान
2.5 ते 3 तासांचे अंतर असावे. खूप मसालेदार पदार्थ किंवा मांसाहार संध्याकाळच्या जेवणात
नसावा. तेल 15 एमएल / Day / Person दोन व्यक्तींसाठी एका महिन्यात “एक किलो” ते वापरावे. जंगफूड- पिझ्झा,
बर्गर, बेकरी उत्पादने शक्यतो टाळावीत. जेवत असताना “कोला” पिण्याची सवय पोटासाठी हानीकारक
आहे. भरपूर पाणी प्यावे. 10 ते 15 ग्याल प्रती दिन. सर्वात जास्त कॅल्शियम असणारे घटक-
मेथी, सोयाबिन, बदाम, उडीद, कोबी, बीट. Vit B12 युक्त घटक- दूध, दही, अंडी, फिश, चिकन,
मटण. तंतूयुक्त घटक- सर्व पालेभाज्या, फळे, होलग्रेन्स, पोटसाफ होण्यासाठी फायबर (तंतू)
फार आवश्यक आहे. पोटाचे विकार आणि पाठदुखी यांचा फार जवळचा संबंध आहे.
ॲन्टिऑक्सिर्डंटयुक्त घटक – 1) डाळींब – लिव्हर व पोटाच्या
सर्व व्याधींवर गुणकारी. 2) पेरु – सर्वात जास्त ॲन्टिऑक्सिडंट असणारे फळ. 3) आवळा-
शरीरातील सर्व पेशींना सी आवश्यक असते.
नियमित व्यायाम- जगातील सर्वात स्वस्त इन्शुरन्स जर कोणता
असेल तर तो नियमित व्यायाम हा आहे. मान दुखी, पाठ दुखी, खांदे दुखी, कोपर दुखी, मनगट
दुखी, गुडघे दुखी, टाच दुखी यासाठी वेगवेगळे व्यायाम करण्यापेक्षा अस्थिरोग तज्ज्ञ
डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायात करावेत.
योग्य वेळी योग्य झोप- मानसिक संतुलन राखण्यासाठी व पचनक्रियेसाठी
झोप फार आवश्यक आहे. झोपेच्या वेळेत वारंवार बदल शरीरावर विपरीत परिणाम घडवतो. त्यासाठी
कामाच्या वेळा निश्चित करणे गरजेचे आहे. किमान सहा ते आठ तास झोप ही झालीच पाहिजे.
झोप न होणे ही स्ट्रेसची मुख्य जननी आहे. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मेडिटेशन करावे.
योग्य पद्धतीने चालणे, बसणे, उठणे, वजन उचलणे, प्रवास करणे, झोपणे आवश्यक, यास आपण
पोश्चर असे म्हणतो. सतत काम करणे टाळावे. विश्रांती व करमणूक आवश्यक. संगणकासमोर बसल्यानंतर
एक ते दीड तासानंतर ब्रेक घ्यावा. नवचेतना निर्माण करण्यासाठी विश्रांती व बदल आवश्यक.
धुम्रपान व मद्यपान टाळावे. सर्स्पेशन खराब असणाऱ्या गाड्या वापरु नका. झोपताना सपाट
व कडक अंथरुणावर झोपावे. पोश्चर करेक्शनसाठी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उंच टाचेच्या बुटांचा किंवा चपलांचा वापर टाळावा. मान मोडून किंवा मॅन्यूपलेशन करुन
घेऊ नये. गावठी इलाज टाळावेत. सनबाथ- सूर्यप्रकाश दररोज काही काळ व्यतित करणे आवश्यक
आहे. आजार अंगावर काढणे टाळावे. योग्य निदान योग्य उपचाराचे सर्व टाळता येईल.
- डॉ. संजय कामत अस्थिरोग तज्ज्ञ पुणे मो. 9822437882